पत्नीचा खून केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील नांदवी येथील आतिफ पोपेरे याला दुबई न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र न्यायालयाच्या या शिक्षेबाबत आतिफच्या घरचे लोक आणि नांदवी गावातील नागरिक अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
माणगाव तालुक्यातील नांदवी हे छोटेसे गाव सध्या चांगलेच चच्रेत आले आहे. निमित्त ठरले आहे, ते या गावातील एका तरुणाला दुबईत झालेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेचे. गावातील लोक या शिक्षेबाबत फारसे सजग नसले तरी आतिफने केलेल्या कृत्याबाबत गावात नाराजीचा सूर उमटत आहे.
माणगाव तालुक्यातील नांदवीचा आतिफ पोपेरे. सुट्टीच्या काळात आतिफ हा मुंबईत राहणाऱ्या आपल्या काकाकडे मुक्कामाला येत असे. याच वेळी, आतिफची ओळख मिनी धनंजयन या माटुंगा येथील कॉलेज विद्याíथनीशी झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले. २००८ साली मिनीने घरातील विरोध झुगारून आंतरजातीय विवाह केला. विवाहानंतर धर्म बदलून यानंतर मिनीने बुशरा नाव धारण केले.
लग्नानंतर आतिफ आणि मिनी यांनी एका मुलीला जन्म दिला. याच काळात आतिफ नोकरी निमित्ताने दुबईला स्थलांतरित झाला. दोन वर्षांनी २०११ साली मिनीसुद्धा दुबईला गेली. मुलीची आबाळ होऊ नये म्हणून मिनी आणि आतिफ यांनी आपल्या मुलीला नांदवी येथील आजोळी ठेवले होते. यानंतर मार्च २०१३ ला मिनी दुबईतून बेपत्ता झाल्याचे तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. १३ मार्च २०१५ ला मिनीचा मृतदेह हा दुबईतील अल फुका परिसरात आढळून आला. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास दुबई पोलीस करीत होते. दुबईतील उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सुनावणीनंतर आतिफ आणि त्याच्या एका मित्राला मिनी हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आणि जून २०१३ मध्ये आतिफ दुबई पोलिसांना शरण आला. त्यानंतर दुबई कोर्टाने आतिफचे अपिल फेटाळले आणि नुकतीच त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
आतिफचे मूळ गाव असलेल्या नांदवी येथे भेट दिली असता त्याच्या घराला कुलूप असल्याचे पाहायला मिळाले. आतिफचे वडील नोकरीनिमित्त दुबईत असतात. आतिफची आई फैरोजा व ६ वर्षांची मुलगी झीनत इथे राहतात. या दोघीही नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेर गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. आतिफला झालेल्या शिक्षेबाबत ग्रामस्थांना फारशी माहिती नाही. आज माध्यमांमधूनच ही माहिती मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र दुबई पोलीस किंवा न्यायालयाने आतिफला झालेल्या शिक्षेबाबत त्याच्या नातेवाईकांना कळवले की नाही याबाबत गावकरी अनभिज्ञ असल्याचे स्थानिकांनी सांगितले.