जळगाव महापालिकेत भाजपच्या एकहाती सत्तेला शिवसेनेने सुरूंग लावला असून सांगलीनंतर दुसरी महापालिका भाजपला गमवावी लागली आहे. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपची २७ मते फोडून केवळ १५ सदस्य असणाऱ्या शिवसेनेने दोन्ही पदांवर ताबा मिळविला. महापौरपदी जयश्री महाजन तर, उपमहापौरपदी कुलभूषण पाटील विजयी झाले.

गुरुवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात ऑनलाइन पध्दतीने झालेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजप-सेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उमेदवारांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नाकारण्यात आला. जवळपास साडेतीन तास प्रक्रिया चालली. मतदानाआधीच भाजपचे जवळपास निम्मे सदस्य फुटले होते. अखेरच्या क्षणी भाजपकडून सेना उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतले गेले. परंतु, ते निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले. महापौरपदाच्या निवडणुकीत सेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव केला. महाजन यांना ४५ तर, कापसे यांना ३० मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली. सेनेचे उमेदवार तथा भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश सोनवणे यांना तेवढ्याच फरकाने पराभूत केले. भाजपचे फु टीर २७ आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही पारड्यात मते टाकल्याने सेनेचा मार्ग सुकर झाला. पुरेसे संख्याबळ नसताना भाजपमध्ये उभी फूट पाडत शिवसेनेने ही किमया केली. खासदार विनायक राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने भाजपच्या संकटमोचकांना घरच्या धावपट्टीवर चितपट करण्यात आले. निवडणुकीआधीच २७ नगरसेवक सेनेला जाऊन मिळाल्याने भाजपच्या सत्तेला अडीच वर्षात ग्रहण लागले. महापालिका निवडणुकीत भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले होते. यावेळी सेनेने तोच कित्ता गिरवला. माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला दारूण पराभवाला तोंड द्यावे लागले. खडसे यांनी हा गिरीश महाजन यांच्या गर्विष्ठपणाचा पराभव असल्याचा टोला लगावला. जळगावकरांनी मोठ्या अपेक्षेने भाजपला सत्ता दिली होती. मात्र त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. यामुळे नगरसेवक आधीच नाराज होते. त्यांना फोडण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले नाहीत. तीन, चार ठेकेदारांना हाताशी धरून कामे करण्याचा महाजनांचा प्रयत्न पूर्ण झाला नाही. नगरसेवकांशी ते अतिशय गर्विष्ठपणे बोलत असल्याचा फटका भाजपला बसल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. सेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांना अडीच वर्षात नगरसेवकांची नांवेसुध्दा  माहिती नसल्याचे नमूद केले. कोणत्याही स्वार्थासाठी त्यांनी बंडखोरी केली नाही. जळगावच्या विकासासाठी ते सेनेबरोबर आल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, आपले आक्षेप फे टाळणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

बालेकिल्ल्यातच घाऊक बंडाळी

काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसलेल्या जळगाव पालिके त शिवसेनेने २७ नगरसेवक फोडून भाजपला धोबीपछाड दिला. त्यासाठी ‘एमआयएम’च्या तीन सदस्यांनीही शिवसेनेला मदत करून नव्या राजकीय समीकरणास जन्म दिला. भाजपचे खान्देशातील संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात झालेली घाऊक बंडाळी राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.

पक्षीय बलाबल/एकूण ७५

  • भाजप- ५७

(२७ नगरसेवकांची बंडखोरी)

  • शिवसेना- १५
  • एमआयएम- तीन