अपुऱ्या पावसाचा परिणाम

नागपूर : यंदा विलंबाने आणि कमी पाऊस झाल्याने विदर्भात पेरण्या खोळंबल्या असून धरणे न भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पुढच्या काळात पावसाने तूट भरून न काढल्यास हे संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने धरणे पूर्ण भरलीच नाहीत. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात सर्वत्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. पावसाळ्यात धरणे भरतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मुळातच मोसमी पावसाला विलंब झाला. तो सक्रिय झाल्यावरही आजपर्यंत अपेक्षेप्रमाणे बरसला नाही. त्यामुळे एकीकडे धरणे रिकामीच असून त्यामुळे पेयजलाचे संकट निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे पेरण्याही खोळंबल्याने खरिपाचे नियोजन बिघडले आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशीम हे जिल्हे पाणीटंचाईने अधिक प्रभावित आहेत. या जिल्ह्य़ांमध्ये अजूनही ४२७ टँकर सुरू आहेत.  मोसमी पाऊस येण्यापूर्वी येथे टँकरची संख्या ५५३ होती. बुलढाणा जिल्ह्य़ातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या ३३० वरून १६७ पर्यंत खाली आली आहे. मात्र, विभागातील पाच जिल्ह्य़ांचा विचार केल्यास अजूनही ४२७ टँकर सुरू आहेत, असे अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी सांगितले.

नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे सर्व जिल्हे मिळून एकूण १९.२७ लाख  हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यापैकी प्रमुख पीक धानाची लागवड ७.६४ लाख हेक्टरवर केली जाते. भाताच्या रोवणीसाठी शेतात पाणी साचण्याची गरज असते, त्यासाठी जोरदार पाऊस हवा आहे. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या व्हायला हव्या होत्या, परंतु कमी पावसामुळे ३९.५ टक्केच शक्य झाल्या. धानाची पेरणी ३० टक्के व्हायला हवी होती ती केवळ ५ टक्के झाली, असे नागपूर विभागाचे सह संचालक (कृषी) रवी भोसले यांनी सांगितले. अमरावती विभागात आतापर्यंत सरासरीच्या ७४ टक्के, तर नागपूर विभागात सरासरीच्या ७७ टक्के पावसाची नोंद झाली. पुढील पाच दिवसात विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचे नागपूरच्या हवामानशास्त्र विभागाचे उपमहानिदेशक एम.एल. साहू यांनी सांगितले.