25 February 2020

News Flash

दुष्काळातही दर दिवसाआड पाणी पुरवणारे आदर्श मावलगाव

सुमारे १७५ कुटुंब व १६०० लोकसंख्या असलेल्या मावलगावमध्ये सामूहिकतेतून अनेक उपक्रम गेल्या कैक वर्षांपासून राबवले जात आहेत.

चकाचक रस्ते व दुतर्फा झाडांची गर्दी.

प्रदीप नणंदकर

विदर्भ व मराठवाडय़ात दुष्काळाची अतिशय भीषण तीव्रता आहे. अशा स्थितीतही एखाद्या गावाला एक दिवसाआड नळाने पाणीपुरवठा केला जात असल्याचे कोणी सांगितले तर त्यावर विश्वासच बसणार नाही. मात्र, ही किमया अहमदपूर तालुक्यातील मावलगाव या छोटय़ाशा गावातील लोकांनी सामूहिक प्रयत्नातून करून दाखवली आहे.

सुमारे १७५ कुटुंब व १६०० लोकसंख्या असलेल्या मावलगावमध्ये सामूहिकतेतून अनेक उपक्रम गेल्या कैक वर्षांपासून राबवले जात आहेत. घर तेथे शोषखड्डा, प्रत्येक घरी शौचालय, कचराकुंडी व घंटागाडीची सोय, एक गाव एक स्मशानभूमी हे उपक्रम या गावात राबवले जातात. गावालगतच्या पाझर तलावात या वर्षी असलेल्या पाण्याचा वापर केला तर रब्बीचे पीक शेतकऱ्याला घेता आले असते.  मात्र, सर्व गावकऱ्यांनी मिळून हे पाणी पिण्यासाठी राखून ठेवू या, असा निर्णय घेतला. परिणामी अशा उन्हाळय़ातही प्रत्येक घराला दर दिवसाआड एक हजार लिटर पाणी नळाने पुरवले जात आहे.

गावात ग्रामपंचायतीमार्फत आरो प्लँट बसवला असून पाच रुपयांत २० लिटर पाण्याचा जार दिला जातो. संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहेत. घराचा नमुना नंबर ८ अ महिला व पुरुषांच्या नावावर आहेत. प्रत्येक घराच्या दारावर महिलेचे नाव आहे. गावातील सर्व घरांना एकच रंग दिलेला आहे. गावातील भिंतीवर सुविचार व म्हणी लिहिल्या आहेत. १७ महिला बचतगटांची स्थापना झाली आहे. गावात मुलगी जन्माला आली की ग्रामपंचायतीच्या वतीने दोन हजार रुपये तिच्या नावाने बँकेत भरले जातात व १८ वर्षांनंतर तिच्या पालकांना ते पसे दिले जातात. दर आठवडय़ाला सार्वजनिक स्वच्छतेसाठी सर्व गावकरी एकत्र येतात. गावात प्लास्टिक बंदी करून प्रत्येक घरी कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे.

गावात सुमारे एक हजार आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत.  प्रत्येक कुटुंबाने किमान चार झाडे सांभाळलीच पाहिजेत असा दंडक घालण्यात आला आहे. घरात शौचालयाचा वापर, सर्व सोयी त्यामुळे महिलांना एकमेकांना भेटण्याचे प्रसंग कमी झाले म्हणून गावच्या सरपंच रुक्मीणबाई संपते यांनी धोबीघाटची संकल्पना मांडली. ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा करून महिलांना धुणे धुण्यासाठी एक ठिकाण करण्यात आले. त्या ठिकाणी धुणे धुण्याच्या निमित्ताने महिलांच्या आपासात गप्पाही व्हायला लागल्या. जिल्हय़ातील पहिला धोबीघाट या गावात तयार झाला आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने दोन वर्षांपूर्वीच सार्वजनिक कडबाकुट्टी यंत्र बसवण्यात आले असून शेतकऱ्यांना यासाठी एक पही आकारली जात नाही. शेतकऱ्यांनी स्वतचा कडबा आणून त्याची कुट्टी करून तो घेऊन जायचा. गावात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने पिठाची गिरणी बसवण्यात आली असून त्यासाठी लोकांना पसे द्यावे लागत नाही. दळण मोफत दिले जाते. ग्रामपंचायतीचा कर १०० टक्के भरायला हवा, ही अट घालण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी शंभर टक्के करवसुली होते. त्यातून सर्व सुविधा ग्रामपंचायतीमार्फत लोकांना दिल्या जातात. संपूर्ण गाव विमा ग्राम म्हणून जाहीर झाले आहे. धोबीघाटाच्या सांडपाण्यावर झाडे पोसली जातात व सांडपाणी देखील ठिबकने झाडांना दिले जाते. गावातील चौकांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सार्वजनिक वाचनालय चालवण्यात येते. जवळपास प्रत्येक घरी एक देशी गाय आहे. त्यामुळे दुधासाठी हे गाव स्वयंपूर्ण आहे. सेंद्रिय शेतीचा लाभ चांगला होत असल्याचा अनुभव अनेकांनी सांगितला. गावच्या सरपंच रुक्मीणबाई संपते यांनी २५ वर्षांपासून गावचे माजी सरपंच शरद पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शावर गाव पुढे जात आहे. सर्व ग्रामस्थ एकोप्याने निर्णय करतात. त्यामुळेच आमच्या गावाला दुष्काळ जाणवत नसल्याचे सांगितले. सर्वानी मिळून प्रश्न सोडवायचे ठरवले तर प्रश्नच शिल्लक राहणार नाहीत असेही त्या म्हणाल्या. मावलगावने जे उपक्रम राबवले, तसे उपक्रम अन्य ग्रामस्थांनी राबवले तर अनेक प्रश्न आपोआप सुटतील.

First Published on April 25, 2019 2:36 am

Web Title: due to drought the ideal way to provide water supply every day
Next Stories
1 दोन महिन्यांनंतर ठेकेदारास अटक
2 कुपोषणनिर्मूलनास प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात
3 रुग्णालये आहेत, पण उपचार नाहीत
Just Now!
X