करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. टाळेबंदी असल्याने शहरी भागात एक दिवसाआड भाजीपाला विक्रीला परवानगी आहे. मात्र ठरवून दिलेल्या वेळेतच दुकाने बंद करावी लागतात. शेतकऱ्यांकडील टोमॅटो, कोबी, पालेभाज्या ठरावीक वेळेतच काढाव्या लागतात.

सर्वच शेतकऱ्यांना बाजारात भाजीपाला विक्री करण्याची संधी उपलब्ध होत नसल्यामुळे मिळेल त्या भावात माल विकावा लागतो. त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने आज तरी शेतकरी हवालदिल झाला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथील एका शेतकऱ्याने कोबीच्या शेतात जनावरे सोडून दिली.

जिल्ह्य़ात वारंवार पडणारा अवकाळी पाऊ स शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे. गेल्या सोमवारी काही भागांत पावसाने हजेरी लावली, तर मंगळवारी बासंबा शिवारात जोरदार पाऊ स झाला. अंगावर वीज कोसळून १४ वर्षीय घनशाम पांडुरंग देवकर याचा जागीच मृत्यू झाला. टाळेबंदीत जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून सुरुवातीला तीन दिवसांनंतर, तर आता एक दिवसाआड किराणा व भाजीपाला विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ९ ते १ यादरम्यान दुकाने सुरू  ठेवता येतात.

शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनावर होणारा खर्च, खुल्या बाजारात आणण्यासाठी वाहतुकीवर होणारा खर्च लक्षात घेता भाजीपाल्यांचे भाव गडगडले आहेत. वेळेच्या आत मालाची विक्री न झाल्यास मिळेल त्या भावात शेतकऱ्याला भाजीपाला द्यावा लागत आहे.

परंतु खुल्या बाजारात त्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकरी शेषराव सावळे यांनी रोजच्या परिस्थितीला वैतागून, मालाला उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळत नसल्यामुळे, आपल्या कोबीच्या शेतात जनावरे सोडली. शेतात राबराब राबून चांगले उत्पादन मिळावे म्हणून बियाणे, खत फवारणी करत पाणी देत पिकाचे उत्पादन काढूनही त्याला भाव मिळत नाही.