कीर्ती केसरकर

कोल्हापूर, सांगलीत आलेल्या महापुराचा फटका वसई-विरार शहरातील भाजी मंडईलादेखील बसला आहे. भाज्यांचा पुरवठा नियमित होत नसल्याने भाज्यांचे दर तिपटीने वाढले आहेत, तर महागाईमुळे ग्राहकांचा कल रान भाज्यांकडे झुकला आहे.

कोल्हापूर व सांगलीतून सर्वत्र भाजी पुरवठा होत असतो. मात्र, पूरस्थितीमुळे भाज्यांचा पुरवठा खंडित झालेला आहे. पूरस्थिती निवळत असली तरी वाहतूक सुरळीत नसल्याने भाज्यांची वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे.

सध्या दादर, कुलाबा, उल्हासनगर, पालघर, बोरीवली सारख्या मोठय़ा शहरी मंडई मध्ये देखील भाज्या उपलब्ध नसल्याने वसई विरार शहराला याचा फटका बसला आहे. भाजी मंडईत मोजक्या भाज्या उपलब्ध असून त्यांच्या किंमतीत तिप्पट वाढ झालेली आहे.

भाज्यांच्या किंमती सतत वाढत असल्या तरी गावठी भाज्यांच्या किंमतींमध्ये फरक पडलेला नाही. वसई विरार मध्ये ग्रामीण पट्टा देखील मोठय़ा प्रमाणात असल्याने इथे रानभाज्यांची शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते.

मात्र, शहरात भाजी मंडई असल्याने गावठी भाज्यांकडे ग्राहकांचे सहज लक्ष जात नाही. परंतु, सध्या सर्वत्र भाज्यांचे दर आकाशाला पोहोचले असल्याने नागरिकांचा कल गावठी भाज्यांकडे झुकला आहे. तर सध्या ज्या भाज्या शहरातल्या मंडईत उपलब्ध आहेत.

गेल्या दोन आठवडय़ांपासून ग्राहकांची गर्दी वाढली आहे. रानभाज्यांची चांगली विक्री होत आहे. ग्राहक आवडीने गावठी भाज्या विकत घेत आहे

— ज्योती भोईर, गावठी भाज्या विक्रेता

मोठय़ा मंडईतून भाज्या येत नसल्याने भाज्यांचा तुटवडा होत आहे. यामुळे भाज्या महाग आहेत. आम्हाला देखील भाज्या महाग मिळत असल्याने आम्ही भाजी महाग विकत आहोत तसेच भाज्यांचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा असल्याने तिप्पट किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सध्या ग्राहकांमध्येही काहीशी नाराजी आहे.

राम कदम, मंडई भाजी विक्रेता