रामकुंड व कुशावर्त येथे शनिवारी सिंहस्थातील पहिल्या पर्वणीस येण्यापासून भाविकांना प्रतिबंध करणे व गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ठिकठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदीचा विपरीत परिणाम भाविकांची फरफट होण्यात झाला. पोलिसांच्या नियोजनामुळे त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी भाविकांना दहा किलोमीटर पायपीट करावी लागली. नाशिकमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. इतक्या ठिकाणी रस्ते अडविले की, स्थानिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले. शिवाय बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना गोदावरी पात्राकडे ये-जा करताना र्निबधांमुळे अक्षरश: नाकीनऊ आले.
पर्वणीला अंदाजापेक्षा कमी भाविक दाखल होण्यामागे सुरक्षा यंत्रणांनी केलेला बागुलबुवा हेदेखील महत्त्वाचे कारण ठरले. या दिवशी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची वाहने नाशिक शहराच्या हद्दीलगत थांबविली गेली. त्या ठिकाणाहून त्यांना अंतर्गत वाहनतळापर्यंत बसची व्यवस्था होती. या तळापासून भाविकांना वेगवेगळ्या घाटांवर नेण्याचे नियोजन नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आले होते. बसद्वारे उतरल्यावर कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागल्याने भाविकांची दमछाक झाली. ठिकठिकाणी अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. गर्दी होऊ नये म्हणून भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडले गेले. त्यात काहींचे नातेवाईक गोदापात्रात तर काही अडथळ्यात अडकले. स्नान झाल्यावर त्यांना पात्रालगत थांबू दिले जात नव्हते. मिरवणुकीत भाविकांना सहभागी होऊ दिले जाईल की नाही याबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या परप्रांतातून आलेल्यांना दंडुक्यांचा प्रसाद देण्यात आला. प्रत्येक घाटावर ये-जा करण्याचा मार्ग वेगवेगळा असल्याने बहुतेक जण गोंधळून गेले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी रामकुंड ते दहीपूल परिसरात पंचवटीकडील बाजू भाविकांसाठी बंद केल्याने हा संपूर्ण भाग रिता दिसत असताना ठिकठिकाणी अडथळ्यांमुळे शेकडो भाविक अडकल्याचे चित्र दुसरीकडे दिसत होते. म्हणजेच भाविकांना यावयाचे असतानाही त्यांना अडकविण्यात आले. त्यात शहरातील दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिल्यामुळे वणवण करणाऱ्यांना पाणी व खाद्यपदार्थ मिळणेही अवघड झाले.
त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी भाविकांना १० किलोमीटरची पायपीट करावी लागली. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे धास्तावलेल्या २४ भाविकांनी नाशिकला येऊन त्र्यंबकच्या हॉटेलमध्ये केलेली नोंदणी रद्द केल्याचे सह्याद्री हॉटेलचे व्यवस्थापक निखिल कपुरे यांनी नमूद केले. वयोवृद्ध आईला अहमदाबादहून घेऊन आलेल्या अनु झा यांनी संतप्त भावना व्यक्त केली. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरल्यावर बसने त्यांना द्वारका चौकात सोडण्यात आले. तिथून पायी जात त्र्यंबकेश्वरची बस पकडली. मग खंबाळे येथे सोडण्यात आले. तिथून दुसऱ्या बसने आणखी एका ठिकाणी सोडण्यात आले. मग पाच ते सहा किलोमीटर पायी चालावे लागले. इतकी पायपीट होणार असल्याचे माहीत असते तर आपण आईला आणलेच नसते, असे त्यांनी नमूद केले.