पुणे जिल्ह्यातील मावळ परिसर हा भात शेती बरोबरच गुलाब उत्पन्नासाठी ओळखला जातो. येथील गुलाब दरवर्षी परदेशात जातो. परंतु, यावर्षी करोना, चक्रीवादळ आणि परतीच्या पावसाने गुलाब उत्पादकांचे कंबरडे मोडले असून उत्पादक संकटात सापडला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गुलाबाची बाजारपेठ आणि किरकोळ विक्री बंद असल्याने फुलांची पुट्टी करून गांडूळ खत करण्याची वेळ गुलाब उत्पादकांवर आली आहे. तर, परतीच्या पावसाने गुलाबांना असलेले पोषक वातावरण बदलल्याने त्याच्यावर रोग पडत आहे. त्यामुळे यावर्षी ७० टक्के नुकसान होण्याची शक्यता गुलाब उत्पादन ज्ञानेश्वर भिकाजी ठाकर यांनी व्यक्त केली आहे.

पहिल्यादा करोना महामारीने हाहाकार माजवला यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कठोर पाऊल उचलत लॉकडाऊन घोषित केले. आजही काही शिथिलता देऊन लॉकडाऊन लागू असून गेल्या सहा महिन्यांपासून गुलाब उत्पादकांना मुख्य बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यानंतर चक्रीवादळामुळे इतर शेतकऱ्यांसह गुलाब शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. मात्र, राज्य शासनाने कोणतीच मदत केली नाही असं ज्ञानेश्वर यांनी सांगितले आहे. एवढं पुरे असताना परतीच्या पावसाने चांगलंच झोडपून काढलं. याचा थेट फटका गुलाबाच्या उत्पन्नावर झाला असून सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे गुलाबाच्या झाडांवर रोगराई पसरली आणि पानं गळून पडली. यावर मात करण्यासाठी आठवड्याला हजारो रुपयांची औषधं फवारावी लागत आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून सर्वच मंदिर, सार्वजनिक कार्यक्रम आणि विवाह सोहळा यावर बंधन आली असून याचा थेट फटका गुलाब उत्पादकांना बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून साठलेल्या फुलांची पुट्टी करून अक्षरशः गांडूळ खत तयार केलं असल्याची माहिती ज्ञानेश्वर यांनी दिली आहे.

गणपती उत्सवानंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. सर्व सुरळीत झालं मात्र खर्च निघाला नाही. लॉकडाऊन उठवल्यानंतर तर शेतकऱ्यांनी गुलाबाला खत-पाणी घालून जोमाने वाढवलं. चक्रीवादळामुळे तीस टक्के शेतकरी आधीच उध्वस्त झालेत. लॉकडाऊनने कंबरड मोडलं आहे. तर, परतीच्या पावसाने झोडपून काढलं असून यात मोठं नुकसान झालं आहे. गुलाबाची ४५ ते ६५ दिवसांमध्ये एक तोडणी होते. वर्षाकाठी सात तोडण्या होतात, एकरी २५ लाखांचे उत्पन्न दरवर्षी निघते. मात्र, यावर्षी लॉकडाऊन आणि परदेशात फुले पाठवण्याचा निर्णयावर सर्व काही अवलंबून असल्याचं ज्ञानेश्वर सांगतात.