25 August 2019

News Flash

‘तुंगारेश्वर’मधून बिबटे, मोर गायब

बिबटय़ा आणि मोरांची संख्या शून्यावर आली आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रसेनजीत इंगळे

रात्र शिकारींमुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत घट; मात्र यंदाच्या गणनेत रानडुकरे वाढली

वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यातील वन्यप्राणी पक्ष्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे. बिबटय़ा आणि मोरांची संख्या शून्यावर आली आहे. वन विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. यात रानडुकरे अपवाद ठरली आहेत. त्यांची संख्या चारवरून नऊ झाली आहे.

वसईच्या पूर्वेला तुंगारेश्वर अभयारण्य आहे. दरवर्षी वन विभागातर्फे या अभयारण्यातील वन्य पशूंची गणना केली जाते. मागील पाच वर्षांपासून होत असलेल्या गणनेत वन्यपशूंची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा सर्वेक्षणातही वन्यपशूंची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे आढळून आले आहे. या वर्षी १८ मे २०१९ पर्यंत ३० कॅमेऱ्यांच्या साहाय्याने सर्वेक्षण करण्यात आले होते. ही गणना तुंगारेश्वर, कामण, पोमण, पायगाव पेल्हार, जुचंद्र, चिंचोटी येथे असलेल्या पाणवठय़ावरील कॅमेऱ्यातील नोंदीद्वारे करण्यात आल्या आहेत. यंदा एकही बिबटय़ा आढळलेला नाही. गेल्या वर्षी चार बिबटे होते.

तस्करांचा सुळसुळाट

तुंगारेश्वर अभयारण्यातील वनसंपदा आणि पशुपक्षी वाचविण्याची गरज वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केली आहे. वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता असल्याने गस्त घालता येत नाही. अनेकदा वन विभागाच्या समोरूनच लाकडांची तस्करी केली जाते, मात्र त्यांना पकडणे शक्य होत नाही. आम्ही वनसंपदा तसेच पशुपक्ष्यांना वाचविण्याचे प्रयत्न करत आहोत, असे तुंगारेश्वर अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांनी सांगितले. आम्ही रात्रीची गस्त वाढवली आहे. रात्री शिकारीसाठी आगी लावल्या जातात. त्या रोखण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले.

First Published on July 20, 2019 12:20 am

Web Title: due to night hunting decrease in number of wildlife tungareshwar abn 97