रस्त्यावरील खड्डयांमुळे घडलेले अनेक किस्से आणि संतापजनक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. यावरून राज्यात विविध ठिकाणी अनेक आंदोलन मोर्चे होतात. सामान्य लोकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. आता औरंगाबादमध्ये याच खड्ड्यांमुळे नागरिकांवर आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ आली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याने शहरातील रिक्षा चालकांकडून जास्तीचे भाडे आकारले जात आहे. खड्डे बुजवले तर आम्ही देखील भाडं कमी करू, असं मत रिक्षाचालकांनी व्यक्त केलं.

पैठणगेट येथून महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीकडे जायचं म्हटलं तर रिक्षाचालक ४० रूपये भाडे आकारतात. हे अंतर साधारण दीड ते दोन किलोमीटर इतकेच आहे. त्यामुळे नागरिकांकडून या वाढीव भाड्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, याबद्दल रिक्षाचालकांना विचारले असता रस्त्यावर खड्डे जास्त असल्यामुळे आम्ही जास्त पैसे आकारत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भविष्यात रस्त्यावरचे खड्डे बुजवले तर आम्ही भाड्याचा दरही कमी करू, असेही रिक्षाचालकांनी सांगितले.

तक्रारदार रिक्षाचालक संघटनांमध्ये पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या रिक्षा युनियनचाही समावेश आहे. विशेष करून गुलमंडी येथील रिक्षाचालकांनी यासाठी पुढाकार घेतलाय. गुलमंडी इथं शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची कार्यालय आणि निवासस्थाने आहेत. खैरेंच्या कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर शिवसेनेच्या महाराष्ट्र रिक्षा युनियन शाखा आहे. सुनील सगरगुंड यांच्या अध्यक्षतेखाली उभारण्यात असलेल्या या रिक्षास्टॅन्डवर २० रिक्षा उभ्या राहू शकतात. यातील बहुतेक रिक्षा चालक खड्डे बुजवले तर रिक्षा भाडं कमी करू असं म्हणतात. खासदार, आमदार या भागात राहतात. मात्र रस्त्याची दुरावस्था आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर देखील रिक्षाचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करतात.

शिवसेनेने राज्य महामार्गावरील खड्डयांविरोधात महिनाभरापूर्वी बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. शिवसेना जिल्हा प्रमुख आंबदास दानवे यांच्यासोबत महापौर नंदकुमार घोडेले देखील मोर्चात सहभागी झाले होते. पर्यटन राजधानीत खड्डे पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज असतात. रस्त्यावर असलेल्या खड्डयामुळे नागरिक हैराण आहेत. त्यामुळे खड्डे बुजवा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र, सेनेचीच सत्ता असलेल्या औरंगाबादमध्येच रस्त्यांवर अनेक खड्डे आहेत. काही ठिकाणी पॅचवर्कची काम झाली. मात्र, त्याचा दर्जा हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटींचा निधी आला. मात्र, त्यातून होणाऱ्या रस्त्याच्या कामात खड्डयांनी वेढलेल्या अनेक रस्त्यांचा समावेश न करता व्हीआयपी लोकांसाठी खास सेवा देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत महापौर नंदकुमार घोडेले यांना विचारलं असता त्यांनी म्हटले की, मार्चपर्यंत शहरातील रस्ते गुळगुळीत करू. रस्ते कामाच्या निविदा प्रक्रिया सुरु आहे. मात्र, रस्ते व्यवस्थित झाल्यानंतर रिक्षा चालकांनी भाडे कमी करावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.