संत हे हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती किंवा शिख नसतात. ते परमेश्वरी संदेश, प्रेममार्ग आणि मानवीय भक्तीचे प्रतीक असतात. धार्मिक राष्ट्रवादाचा चष्मा लावलेल्या मंडळींमुळे संतांच्या कार्याचा पूर्वग्रहदूषित इतिहास मांडला गेला आहे. पहिल्या दोन दिवसीय सर्वधर्मीय साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी वक्त्यांचा असाच सूर उमटला.
वरोरा येथील हिरालाल लोहिया विद्यालयात आयोजित पहिल्या सर्वधर्मीय संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. उद्घाटन अखिल भारतीय महानुभाव चिंतन परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य न्यायंबास बाबा शास्त्री यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार हंसराज अहीर, नगराध्यक्ष विलास टिपले, मुंबईच्या इंस्टीटय़ूट फॉर पीस स्टडीजचे संचालक इरफान इंजिनीअर, प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. सरफुद्दीन साहील, भन्ते ज्ञानज्योती, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार डॉ. सुहास परतडे महाराज, आबीद अली, संत कबीरच्या अभ्यासिका डॉ. तस्नीम पटेल, ज्ञानेश्वर रक्षक, डॉ. इकबाल मन्न्ो, पुण्याचे कॉ. विलास सोनवणे, प्राचार्य ब्रम्हदत्त पांडे, ना. गो. थुटे, अहमद कादर, हाजी मोहम्मद नासीर साहेब उपस्थित होते. धार्मिक अभिनिवेशामुळे भारतीय उच्चवर्णीय अभ्यासकांनी विविध धर्मातील संतांचे योगदान नाकारले. आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी राज्यात याचे प्रमाण अधिक होते. केवळ मराठी अभ्यासकांनी हे केले नाही. संतांच्या चळवळीचेही राजकीयीकरण केले. राज्यकर्ते आणि धर्मगुरूंच्या सत्ताकारणाने संतांच्या मानवतावादी कार्याना सुरूंग लावला आहे. धर्माच्या मूळ मानवतावादी, बंधुभाववादी संकल्पना या खऱ्या अर्थाने संतांनी व्यवहारात आणल्या. वर्णभेद, धर्मांधता यांच्याविरोधात सर्वधर्मीय संतांचे महान समतावादी व लोकशाहीवादी कार्य जनतेसमोर आणण्यासाठी हे या संमेलनाचे पहिले क्रांतिकारी पाऊल आहे, असे मत संमेलनाध्यक्षांनी व्यक्त केले. खासदार हंसराज अहीर म्हणाले की, समाजाचे काही देणे लागतो. त्या भावनेतून कार्य करू लागलो तर समाज व पर्यायाने देश मोठा होईल. संतांनी वर्तमानाला कसे महत्व देत कसे जगले पाहिजे यांची शिकवण दिली. संतांचा आज सर्वाना विसर पडला आहे.