सीताराम चांडे ,राहता

खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांचा  कायदा व सुव्यवस्था राखण्यातच वेळ जातो, अन्य सामाजिक कार्यात त्यांना वेळ मिळत नाही. पण एका विशिष्ट पोलीस अधिकाऱ्याने सुमारे दोनशे एकर उजाड माळरानावर वनराई फुलवली आहे. पोलीस अधिकारी श्रीकांत पाठक यांच्यामुळे राज्य राखीव पोलीस दलाला वृक्षसंवर्धनाचे दोन पुरस्कार मिळाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या  गट क्रमांक सातचे समादेशक श्रीकांत पाठक यांनी पोलीस सेवेतील दैनंदिन कामकाजाच्या व्यतिरिक्त या गटाच्या २०२ एकरातील उजाड माळरानावर तब्बल १४ हजार विविध वृक्षांची लागवड करीत त्याचे जतन करून हा परिसर निसर्गरम्य केला. त्यामुळे या राज्य राखीव पोलीस गटाला  छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तर व पुणे महसूल विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत

श्रीरामपूरचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकांत पाठक यांची भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) बढती झाल्यानंतर त्यांची नेमणूक  दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सातच्या समादेशकपदी करण्यात आली. पाठक यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी या गटाच्या परिसरातील प्रशासकीय इमारती शस्त्रगार, निवासस्थाने, पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत  व गटामधील विविध ठिकाणी भेटी दिल्या. सदर परिसर भेटीच्या वेळी या गटाची २०२ एकर जमीन असून बऱ्याच ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी योग्य जमीन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या अनुषंगाने त्यांनी गटातील सैनिक संमेलनाच्या व जवानांच्या कुटुंबीयांचा महिला मेळावा घेऊन गटामध्ये वृक्षलागवड करण्याचा मनोदय व्यक्त करून जवान व त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. पाठक यांचे शिक्षण एमएस्सी कृषी असल्याने वृक्ष लागवडी संदर्भात त्याचा फायदा या गटाला झाला. परिसराच्या हिरव्या पर्यावरणासाठी या गटांमध्ये कडुनिंब, उंबर, पिंपळ, चंदन, निलगिरी, सुबाभूळ, अशोका, चिक्कू, सीताफळ, चिंच, शेवगा, आंबा, नारळ, जांभूळ, पेरू, लिंबू, आवळा अशा एकूण चौदा हजार विविध रोपांची लागवड केली. या रोपांचे  चांगल्या वृक्षात रूपांतर झाल्याने गटाचा परिसर हिरवाईने नटल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक झाडांमध्ये शेवग्याचे आंतरपीक घेतले. या गटातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या गटातील भाजी मंडईतूून सेंद्रिय शेवग्याच्या शेंगा मिळतात. सदर शेंगा विक्रीमुळे गटातील पोलीस कल्याणकारी उपक्रमांना फायदा झाला.

ठिबक सिंचन यंत्रणा कार्यान्वित

पाठक यांनी केवळ वृक्षांची लागवड न करता त्याचे जतन व्हावे यासाठी वृक्षांना पाणी देण्यासाठी कायमस्वरूपी ठिबक सिंचन यंत्रणा कार्यान्वित केली. या गटांमध्ये करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीमुळे या गटास महाराष्ट्र शासनाच्यावतीने  छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०१७ राज्यस्तर व पुणे विभाग महसूल स्तरावर असे दोन प्रथम क्रमांकाचे पुरस्कार देण्याचे राज्य शासनाने घोषित केले आहे. या पुरस्काराची रोख रक्कम एक लाख रुपये आहे. पाठक यांचे हे कार्य निश्चितच राज्यातील पोलीस दलाच्या दृष्टीने अभिमानास्पद व आदर्श ठरले आहे. या पुरस्काराचे वितरण २९ जुलै रोजी चंद्रपूर येथे होणार असल्याची माहिती श्रीकांत पाठक यांनी ‘लोकसत्ता’  शी बोलताना दिली.