बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २ ते ४ जुलै दरम्यान विदर्भातील बऱ्याच भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. दरम्यान, आजही नागपूरच्या ग्रामीण भागाच दमदार पाऊस सुरु असल्याने एका नाल्यावरील पूल वाहून गेल्याचे वृत्त आहे. तर एक व्यक्तीदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे सुत्रांकडून कळते.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, पूर्व-अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील इतर भागांत पावसाचे प्रमाण कमी राहील. या दरम्यान पश्चिम-विदर्भाच्या जवळ असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही.

त्याचबरोबर मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खान्देशात मात्र प्रामुख्याने हलका पाऊस पडेल. दरम्यान, ढगाळी वातावरणामुळे या सर्व भागांतील तापमान कमी हाईल. मात्र, ४ तारखेनंतर पुढचे काही दिवस पावसाचे प्रमाण कमी होईल. २ ते ४ जुलैमध्ये नदी-नाल्यांच्या जवळ पुरस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे अशा भागात राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.