प्रशांत देशमुख

अत्यावश्यक वस्तूंचा व्यापाऱ्यांनी साठा करू नये म्हणून प्रशासन सतर्क असले तरी प्रत्यक्षात सामान्य नागरिकच भरमसाठ खरेदी करत आहेत. अशा साठेबाज ग्राहकांमुळे प्रशासन व व्यापारी हैराण झाल्याची स्थिती आहे.

प्रामुख्याने तेल व साखरेचा साठा करून ठेवण्याची नागरिकांची वृत्ती दिसून आली. २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान २०० टन साखर व १५० टन खाद्यतेल बाजारात हातोहात विकले गेले. सरासरी दहा टन तेल व पंधरा टन साखर खरेदीचे प्रमाण आहे. गेल्या दिवाळीतही एवढा उठाव झाला नसल्याचे व्यापारी सांगतात. एरव्ही सामान्य काळात आठवडय़ात ७० टन साखर व ८० टन खाद्यतेल सरासरी विकले जात असल्याची बाजाराची नोंद आहे.

वर्धा जिल्हय़ात प्रामुख्याने नांदेड, कोल्हापूर, सांगली व जामणी येथून साखर येते. ग्राहकांच्या साठेबाजीमुळे यावेळी खास बैतूलवरून साखर आणावी लागली. तेलाचा साठा अमरावती, अकोला, हिंगणघाटमधून येतो. यावेळी छिंदवाडय़ातून अतिरिक्त तेल मागवावे लागले. तेलाचे व्यापारी असलेले वर्धा किराणा र्मचट असोसिएशनचे सचिव ईद्रेस मेमन म्हणाले की ग्राहकांना सांगूनही ते ऐकत नाहीत. अगामी दोन महिने पुरेल असा साठा ग्राहकांनी करून ठेवल्याचे दिसते आहे. अशीच गती राहली तर पुढील काळात लोकांना खुले खाद्यतेल घेण्याची वेळ येऊ शकते.

मदत करतानाही गरज तपासण्याची गरज

एक वेगळी बाब याविषयी आढावा घेताना पुढे आली. स्वयंसेवी संघटना ठोक साहित्य घेवून त्याचे वाटप गरजूंना करतात. मात्र यापैकीच काहींनी वारंवार मदत घेत ती कमी भावाने परत किराणा दुकानदारांना विकल्याचे उदाहरणे पुढे आले आहे. स्वयंसेवी संघटनेचे प्रदीप बजाज म्हणाले की, मदत करताना गरजूंची निकड तपासणे गरजेचे आहे. मदत न मिळालेल्यांनाच मदत देण्याबाबत संस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन बजाज यांनी केले. सुखवस्तू ग्राहकांनी केलेला साठा व आता गरजवंतही साठा करीत असल्याने अशा साठेबाज ग्राहकांवर नियंत्रण ठेवण्याबाबत उपाय करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.