अमरावतीत बनावट नोटांचा गोरखधंदा उघड, दोघांना अटक

अमरावती : पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन बनावट नोटांच्या अवैध व्यवसायात तरुण बेरोजगारांना ओढणाऱ्या टोळीचे प्रताप समोर आले असून गुन्हे शाखेने याप्रकरणात दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी लाखोंच्या बनावट नोटा देखील जप्त केल्या आहेत. मंगेश गिरी (तुलंगना, पातुर, जि. अकोला) व रामेश्वर पेटले (बडनेरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अ. शोएब अ. गफ्फार (आसीर कॉलनी) असे फसवणूक झालेल्या बेरोजगार युवकाचे नाव आहे. मंगेश गिरी याची ओळख अ. शोएब याच्यासोबत काही दिवसांपूर्वी झाली होती. त्याने आपण भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते.

शोएब याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने आयएपीस अधिकाऱ्याकडे असणाऱ्या ओळखपत्रासारखे बनावट ओळखपत्र देखील तयार केले होते. अ. शोएब याला पोलीस विभागात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. अ. शोएब याला याकरिता दहा लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती. अ. शोएब याने दहा लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. मात्र त्याच्या मित्राने हा फसवणुकीचा प्रकार असून आपली देखील अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे अ. शोएब यास सांगितले होते.

मंगेश गिरी याने शोएब याच्याप्रमाणे शहरातील एका महिलेच्या पतीला देखील पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दिले होते. यासाठी तिला देखील पैशाची मागणी करण्यात आली होती.

अ. शोएब यास संशय आल्याने त्याने गुन्हे शाखेला यासंबंधीची माहिती दिली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तोतया आयपीएस अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला. मंगेश गिरी यास अ. शोएब याने शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या समोर पैसे देण्याचे कबूल केले. प्रत्यक्षात मंगेश गिरी हा एका कारमध्ये बसून अ. शोएब याची प्रतीक्षा करीत होता.

यावेळी मंगेश गिरी याने अ. शोएब यास पोलीस खात्यातील रिक्त जागेवर अन्य व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अ. शोएब याच्यासाठी आपल्याकडे आणखी चांगला व्यवसाय आहे. त्याने आपणास २५ लाख रुपये दिल्यास आपण एक कोटी रुपये देणार असल्याचे त्याने सांगितले. अ. शोएब याने बनावट नोटांच्या व्यवहाराची माहिती विचारली. यावेळी मंगेश गिरी याने त्याचा मित्र रामेश्वर पेटले यास फोन करून घटनास्थळी बोलावले.

अ. शोएब याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला दोन हजार रुपयाचे बनावट नोट देखील दाखवण्यात आले. अ. शोएब यास बनावट नोटा दाखवल्यानंतर त्याला २५ लाख रुपयाची मागणी करण्यात आली. याचवेळी पोलिसांनी छापा टाकून मंगेश गिरी व रामेश्वर पेटले या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याजवळून बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या आहेत.