पुण्यात गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल निलिमा गायकवाड यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वांकडून कौतुक होत आहे. स्वतः पाण्यात उतरुन एका लहान मुलाला आपल्या पाठीवर घेऊन निलिमा यांनी अत्यंत्य धाडसाने आपले कर्तव्य पार पाडले. आपत्कालिन परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय कार्याची सर्वत्र चर्चा आहे. निलिमा गायकवाड या दत्तवाडी पोलीस चौकीच्या महिला कॉन्स्टेबल आहेत. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी स्वतः ट्विट करुन निलिमा यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

कालव्याची भिंत फुटल्यानंतर दत्तवाडी पोलीस चौकीतील कॉन्स्टेबल निलिमा गायकवाड यांना आपल्या वरिष्ठांना फोन आला. त्यांनी निलिमा यांना कालव्याच्या खालच्या बाजूला जनता वसाहतीची परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिले. त्यानंतर निलिमा या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि दीड तास त्यांनी पाण्यात अडकलेल्या महिला आणि लहान मुलांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे काम केले.

निलिमा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जेव्हा त्या घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा काही लोक पाण्यात वाहून चालले होते. या कालव्यात खडकवासला धरणातून सुमारे १२०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. दरम्यान, मी माझा मोबाईल आणि पर्स एका व्यक्तीच्या हातात दिले आणि माझे बुट काढत असताना पाहिले की, एक दुकानदार स्वतःला पाण्यात बुडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी मी जवळच्या गॅरेजमधील एक टायर घेतला आणि त्या दुकानदाराच्या दिशेने फेकला. त्यानंतर ती व्यक्ती त्या आधाराने पोहत सुखरुप बाहेर आली.

निलिमा म्हणाल्या, महिला आणि मुलं सैरावैरा धावत होते. ते आपल्या कुटुंबियांना शोधत होते. पाणी त्यांच्या पोटापर्यंत पोहोचले होते. अशा परिस्थितीत लहान मुलांना निलिमा यांनी आपल्या पाठीवर घेऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी हालवले. सुमारे १५ लोकांना निलिमा यांनी सुरक्षित स्थळी नेल्याने त्यांच्या या कार्याचे स्थानिकांनी मोठे कौतुक केले तसेच त्यांना आशिर्वाद दिले. निलिमा यांनी ज्या जैनब रिझवी आणि छाया वाघमारे यांना वाचवले हे तर त्यांचे आभार मानताना थांबतच नव्हते.

यापूर्वीही अनेक आपत्कालिन परिस्थितीत त्यांनी धाडस दाखवले

निलिमा यांच्या या धाडसाची ही बातमी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवी बाब नव्हती. कारण निलिमा यांनी यापूर्वीही अनेकदा आपत्कालीन परिस्थीतीत लोकांना मदत केली आहे. त्यामुळे त्या पुणे पोलिसांतील एक धाडसी पोलीस कर्मचारी असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात.