प्रयागराज येथे बोट दुर्घटनेत नांदेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी देवीदास कच्छवे यांना जलसमाधी मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना दुसरीकडे नायगाव येथील त्यांच्या घरावर मोठा दरोडा पडला. यात चोरट्यांनी मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेली. कच्छवे कुटुंबावरील या दुहेरी आघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, देवीदास कच्छवे हे नायगाव येथील व्यंकटेश नगरमध्ये राहत होते. ते आपल्या सासूच्या अस्थी विसर्जनासाठी पत्नीसह प्रयागराज येथे गेले होते. १० डिसेंबर रोजी सायंकाळी प्रयागराज येथे यमुना नदीत त्यांची बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत बोटीतील १४ नातेवाईक पाण्यात पडले. यातील ६ जणांना वाचवण्यात यश आले मात्र, आठ जणांना जलसमाधी मिळाली. या घटनेत देवीदास कच्छवे यांचाही समावेश होता. त्यांच्या पत्नी सविता देविदास कच्छवे या बचावल्या. पतीचे निधन झाल्याने सविता कच्छवे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, देवीदास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी त्यांचे कुटुंबीय कोलंबी येथे गेले होते. अंत्यसंस्कारानंतर पुढील विधी आटोपण्यासाठी त्यांच्या पत्नी व इतर कुटुंबीय तेथेच थांबले होते. दरम्यान, १३ डिसेंबरच्या रात्री त्‍यांच्या नायगावमधील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घर साफ केले. या धाडसी दरोड्यात चोरट्यांनी कपाट फोडून त्यातील २० तोळं सोनं, ६ तोळं चांदी आणि ५० हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.

देवीदास कच्छवे यांच्या मुलीचे १० फेब्रुवारी २०१९ रोजी लग्न आहे. ते लग्नाच्या तयारीलाही लागले होते, त्यासाठीच त्यांनी आयुष्यभराच्या कमाईतून दागिनेही बनवून ठेवले होते. मात्र, ते ही चोरीला गेले, अशा प्रकारे कच्छवे कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस स्‍थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.