राजा आणि प्रजेमध्ये वर्षांतून किमान एकदा तरी सुसंवाद व्हावा, यासाठी गडचिरोली जिल्हय़ातील ‘अहेरी इस्टेट’च्या राजघराण्याने दसरा उत्सव सुरू केला. दीडशे वर्षांपेक्षा मोठी परंपरा लाभलेल्या या दसरा उत्सवाला आता मात्र उतरती कळा लागली आहे.

देशावर ब्रिटिशांचा अंमल असतानासुद्धा आपले राज्य शाबूत राखणाऱ्या अहेरीचे राजे पहिले धर्मराव आत्राम यांच्या काळात सुरू झालेला हा उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होत होता आणि आजही होत आहे. परंतु आज गर्दी ओसरली आहे. दीडशे वर्षांपूर्वी अहेरी इस्टेटचा पसारा ५५० चौरस मैल परिसरात पसरलेला होता. ५४८ गावांची जमीनदारी व त्यातल्या १८ गावांची मालगुजारी (मालकी) असे या राजवटीचे स्वरूप होते. ब्रिटिशांच्या राजवटीत हे राजघराणे आणखी बहरले. त्याचे बक्षीस म्हणून त्यांनी या घराण्याला एक मोठा राजमहाल बांधून दिला. सध्याच्या घडीला १२० वर्षांचा असलेला हा महाल जागोजागी गतवैभवाची साक्ष पटवतो. हा महाल दुरुस्त करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यानंतर सत्यवानरावांनी तात्पुरता महाल उभारण्याचा निर्णय २५ वर्षांपूर्वी घेतला. सध्या राजघराण्याचे वास्तव्य असलेला हा रुक्मिणी महाल हेच आता या राजवटीचे मुख्य केंद्र झाले आहे. जुना महाल तसाच पडून आहे.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Venus And Sun Yuti
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

या राजघराण्याचे पहिले राजे धर्मराव, नंतर भुजंगराव, तिसरे श्रीमंत धर्मराव, चौथे राजे विश्वेश्वरराव, त्यानंतर राजे सत्यवान व आता राजे अम्बरीशराव आत्राम राजघराण्याचे राजे आहेत. सहाव्या वारसदाराला म्हणजे राजे अम्बरीशराव आत्राम यांना तीन वर्षांपूर्वी वडील सत्यवानरावांचे निधन होताच राजगादी सांभाळावी लागली. भगवंतरावांचे चिरंजीव सध्या राजकारणात सक्रिय असलेले धर्मरावबाबा. राज्य मंत्रिमंडळात तीनदा मंत्रिपद भूषवणाऱ्या धर्मराव बाबांचे घर या राजवाडय़ाला लागूनच आहे. सहाव्या पिढीपर्यंत चालत आलेल्या या राजघराण्यात अमाप लोकप्रियता केवळ श्रीमंत धर्मराव व विश्वेश्वरराव या दोनच राजांना लाभली. धर्मरावांना शास्त्रीय संगीत, नाटक, साहित्य यात रूची होती. संगीताच्या अनेक मैफिली त्यांनी तेव्हा दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरीच्या राजवाडय़ात भरवल्या. प्रख्यात लेखिका दुर्गाबाई भागवत यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. त्यांना परिक्रमेसाठी मदत करणारे राजे अशी धर्मरावांची ओळख होती. आत्राम राजघराण्याची मालमत्ता केवळ अहेरीतच नाही तर संपूर्ण विदर्भात होती. तेव्हाच्या अहेरी राज्यात माडिया व गोंड या आदिवासींची संख्या मोठी होती. दसऱ्याच्या दिवशी या साऱ्या पंचक्रोशीतले आदिवासी अहेरीच्या राजवाडय़ावर जमत. तेव्हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने आदिवासी बैलगाडीचा वापर करून दसऱ्याच्या एक दिवस आधीच अहेरीत यायचे. दसऱ्याच्या एक दिवस आधीपासूनच जमलेली प्रजा रेला नृत्याने राजघराण्याचे मनोरंजन करायची. ज्या गावचे नृत्य चांगले त्याला राजातर्फे बक्षीस दिले जायचे. आजही ही परंपरा कायम आहे.

दसऱ्याला पालखीतून मिरवणूक

दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी जमलेली प्रजा आत्राम राजघराण्यातील वंशजांची पालखीतून मिरवणूक काढते. ही मिरवणूक संपूर्ण गावात फिरून शेवटी गड अहेरीला जाते. आधी इथे किल्ल्याचा परकोट होता. तिथे आदिवासींची गडीबाई ही देवता आहे. मिरवणुकीच्या शेवटी राजांच्या हस्ते या देवतांची पूजा केली जाते. नंतर राजा सीमोल्लंघन झाले, असे जाहीर करीत आपटय़ांच्या पानाची पूजा करतात. यानंतर आदिवासींनी सोबत आणलेल्या कोंबडय़ा मोकळय़ा सोडल्या जातात. यातील किमान एका कोंबडीची शिकार राजाने करावी, अशी अपेक्षा उपस्थित प्रजेकडून व्यक्त केली जाते. त्याप्रमाणे राजा बंदुकीचा बार उडवून कोंबडीची शिकार करतो. नंतर ही मिरवणूक परत राजवाडय़ावर येते. नंतर राजाच्या हस्ते राजघराण्यातील सर्व शस्त्रांची पूजा केली जाते. या शस्त्रांचे प्रदर्शन मांडले जाते. सायंकाळी जाहीर सभेच्या माध्यमातून राजा जनतेशी संवाद साधतो. रात्री जमलेले सर्व आदिवासी कोंबडे तसेच बकऱ्याचा मांसाहार करून दसरा साजरा करतात. त्याच दिवशी रात्री तसेच दुसऱ्या दिवशी दिवसभर प्रत्येक गावातले आदिवासी राजाला तसेच त्यांच्या कुटुंबांना भेटून सोने देतात. आशीर्वाद घेतात. याच वेळी राजाकडून प्रत्येकाला आस्थेने विचारले जाते. गावातल्या परिस्थितीची, पीकपाण्याची माहिती घेतली जाते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळपासून प्रजा परतीच्या प्रवासाला निघते. आता काळाच्या ओघात हा आगळावेगळा दसरा गर्दी गमावून बसला आहे. आता दसरा उत्सवात आधीच्या काही गोष्टी बाद झालेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत या सणासाठी चार ते पाच हजार आदिवासी येत असतात. राजे विश्वेश्वरराव असेपर्यंत गर्दी असायची. आता लोक फारसे येत नाहीत.  अहेरीचे पहिले राजे धर्मराव यांच्यापासून सुरू झालेली ही प्रथा भूजंगराव, श्रीमंत धर्मराव व विश्वेश्वरराव यांनी कसोशीने पाळली. त्यानंतर सत्यवान आत्राम यांनीही दसरा उत्सवाचे महत्त्व जाणले होते. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे चिरंजीव राजे अम्बरीशराव यांना पूजेचा मान मिळाला आहे. सिरोंचा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले राजे अम्बरीशराव आत्राम गडचिरोलीचे पालकमंत्रीही आहेत. त्यांच्याच नेतृत्वात मागील काही वर्षांपासून दसरा उत्सव साजरा होत आहे. आता केवळ एक परंपरा म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.