16 December 2017

News Flash

जेजुरीचा मर्दानी दसरा

येथील दसरा हा खऱ्या अर्थाने मराठेशाहीच्या स्मृती जागवणारा व पारंपरिक लोकसंस्कृतीशी नाते जपणारा आहे.

प्रकाश खाडे, जेजुरी | Updated: September 30, 2017 2:58 AM

साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेला जेजुरीचा खंडोबा हे मराठेशाहीचं दैवत, अठरापगड जातीचं श्रध्दास्थान. या देवाच्या वर्षभर होणाऱ्या यात्रा-उत्सवामध्ये दसरा उत्सवाला विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे गुजरातमधील बडोदा, कर्नाटकातील म्हैसूर व महाराष्ट्रातील कोल्हापूर, कवठे एकंद येथील दसरा उत्सव प्रसिध्द आहेत. तसाच जेजुरीचा ऐतिहासिक मर्दानी दसराही आपले वेगळेपण टिकवून आहे.

येथील दसरा हा खऱ्या अर्थाने मराठेशाहीच्या स्मृती जागवणारा व पारंपरिक लोकसंस्कृतीशी नाते जपणारा आहे. तब्बल १८ तास डोंगरदरीच्या परिसरात चालणारा हा सोहळा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वीस वर्षांपूर्वी रात्रभर डोळे भरून पाहिला आणि त्यांच्या तोंडून सहजच शब्द आले हा साधासुधा दसरा नाही हा तर शिवशाहीची आठवण करून देणारा ‘मर्दानी दसरा.’  त्या वेळेपासून जेजुरीच्या दसऱ्याला ‘ मर्दानी दसरा’ हे नाव पडले. मध्यरात्रीचे चांदणे, गार वाऱ्याची मंद झुळूक, कडेपठारच्या डोंगरदरीतील ‘रमणा ’ या ठिकाणी हजारो भाविकांच्या भक्तिप्रेमाला आलेले उधाण, सदानंदाचा येळकोट असा जयघोष करीत भाविकांकडून होणारी पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण. काळोख्या रात्रीला छेदून आकाशाकडे झेपावणाऱ्या रंगीत तोफा, दरीमध्ये घुमणारा फटाक्यांचा आवाज, या साऱ्या भारलेल्या वातावरणात आपण सारी रात्र डोंगरात काढली हे लक्षातही येत नाही. आश्विन शुध्द प्रतिपदेला सनई-चौघडय़ाच्या मंगल स्वरात खंडोबा गडावरील नवरात्र महालात घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या दिवसात पारंपरिक कलावंत व वाघ्या-मुरळी गायन व नृत्य करतात. नेत्रदीपक विद्युत रोषणाईने सारा गड रात्रीच्या वेळी उजळून निघतो. राज्यातील अनेक कलावंत येथे हजेरी देण्यासाठी येतात. यावेळी शाहीर राम मराठे, सगनभाऊ, होनाजी बाळा यांची कवने, लावण्या म्हणून देवाचे मनोरंजन केले जाते. रात्री अकरानंतर घडशी समाजातील कलावंत सनई-चौघडय़ाचे वादन करतात. यामुळे साऱ्या जेजुरीत चतन्याचे वातावरण असते.

दसऱ्याच्या दिवशी हजारो भाविक, परगावी असणारे ग्रामस्थ आवर्जून जेजुरीत येतात. सायंकाळी पाच वाजता ग्रामस्थ सहकुटुंब खंडोबा गडावर पालखी सोहळ्यासाठी एकत्र येतात. परंपरेप्रमाणे पेशवे इनामदारांनी हुकूम देताच खांदेकरी-मानकरी पालखीला उचलून नवरात्र महालात आणतात. तेथे पुजारी देवांच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवतात. यानंतर पालखी सीमोल्लंघनासाठी रमण्याकडे जायला निघते. ‘सदानंदाचा येळकोट’ या जयघोषात भंडाऱ्याची व आपटय़ाच्या पानांची (सोन्याची) प्रचंड उधळण झाल्याने सारा परिसर पिवळाधमक होऊन जातो. बंदुकीच्या फैरी उडवून पालखी सोहळ्याला सुरुवात होते. अवजड व आकाराने मोठी असणारी खंडोबाची पालखी खांदेकरी गडाच्या पाठीमागील दरीत असणाऱ्या रमणा येथील ओटय़ावर आणून ठेवतात. नंतर सर्व ग्रामस्थ पुन्हा गावात येऊन रात्री खंडोबाचे मूळ स्थान असलेल्या कडेपठारच्या डोंगरात जातात. रात्री नऊ वाजता तेथील मंदिरातील पालखी वाजत-गाजत भेटाभेट सोहळ्यासाठी निघते. या पालखीत खंडोबा-म्हाळसादेवीच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीसोहळा पुढे मार्गस्थ होतो. सनई, चौघडा, ढोल, शंख, डमरू, संबळ, टमकी, घाटी आदी वाद्यो वाजवित पालखी पुढे पुढे चालत राहते. यावेळी राऊत परिवाराकडून हवाई नळे पेटवून उजेड केला जातो. हवाई नळे व मानकऱ्यांच्या हातातील पेटलेल्या दिवटय़ा यांच्या उजेडात पालखी काळोखाला कापीत पुढे सरकत राहते. डोंगरातील कठीण वळणे, उंचवटे, टेकडय़ा पार करताना खांदेकऱ्यांचे कसब पणाला लागते. सुसरटिंगी येथील निमुळती व उंच धोकादायक टेकडी पार करताना मानवी हातांची साखळी करून पालखी वर घ्यावी लागते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशा जयघोषामध्ये पालखी टेकडी पार करते. हा अत्यंत अवघड व चित्तथरारक प्रसंग पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. पालखी रात्री दोनच्या सुमारास नेहमीच्या उंच डोंगरावरील ओटय़ावर आणून ठेवतात. अडीच ते तीनच्या सुमारास रात्री दरीमध्ये असणारी खंडोबा गडातील पालखी व कडेपठारची पालखी यांच्यात भेटाभेट होते. राऊत परिवाराला आरसा दाखवण्याचा मान आहे. दोन्ही पालख्यांतील आरशांमध्ये मूर्ती एकाच वेळी दिसल्या म्हणजे भेट झाली असे मानले जाते. दोन्ही पालख्यांतील अंतर भरपूर असते. भुईनळे व हवाई नळ्यांच्या उजेडात ही भेट होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे साऱ्या डोंगरदऱ्यांना जाग येते. भेटाभेटीचा कार्यक्रम झाल्यावर वाटेत आपटा पूजन करून सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. पहाटे पालखी गावात आल्यावर रावणदहन केले जाते. गावात रांगोळ्या काढून, फटाके वाजवून पालखीचे जंगी स्वागत केले जाते. मंदिराच्या पायथ्याशी धनगर समाजबांधव सुंबरान मांडतात. जुन्या पध्दतीच्या ओव्या, गाणी म्हणत घंटी, ढोल, झांज वाजवली जाते. धनगर भक्त पालखीवर मोठय़ा प्रमाणावर मेंढय़ांची लोकर उधळतात. सकाळी सातच्या सुमारास पालखी गडामध्ये प्रवेश करते. या पालखीतील देवांसमोर स्थानिक कलावंत नाचगाणे करून हजेरी लावतात. खंडोबा देव दमलेले असल्याने पालखी बराच वेळ खेळवली जाते. त्यानंतर मरतड देवस्थानतर्फे खंडा (तलवार) उचलणे स्पर्धा घेण्यात येते. सोनोरीचे सरदार रामराव व महिपतराव पानसे यांनी ही १ मण (४० किलो) वजन असलेली शुध्द पोलादाची तलवार देवाला अर्पण केलेली आहे. या तलवारीचे विविध कसरतीचे प्रयोग कसरतपटू करतात. एका हातात तलवार जास्त वेळ उचलून धरणे, दातात धरून उचलणे, तलवार तोंडात धरून उभे राहणे, खाली बसणे, झोपून तलवार दातात उचलणे, युध्दासारखी हाताने फिरवणे आदी प्रात्यक्षिके पाहताना प्रेक्षकांचे श्वास रोखले जातात. यातील कसरतपटू तीन महिन्यांपासून स्पध्रेची तयारी करतात. चाळीस किलो वजनाची तलवार सहजगत्या त्यांच्या हातात खेळताना पाहून नक्कीच यांच्या अंगात खंडोबाचे बळ आल्याची प्रचिती मिळते. यापूर्वी अनेक परदेशी पाहुण्यांनी व इतिहासप्रेमींनी या स्पध्रेला उपस्थित राहून आनंद घेतला आहे. या स्पध्रेतील विजेत्यांना  बक्षिसे दिली जातात. यानंतर रोजमोरा (ज्वारी) वाटून तब्बल १६ ते १८ तास चालणाऱ्या या मर्दानी दसऱ्याची सांगता होते.

First Published on September 30, 2017 2:58 am

Web Title: dussehra festival celebration in jejuri