साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेला जेजुरीचा खंडोबा हे मराठेशाहीचं दैवत, अठरापगड जातीचं श्रध्दास्थान. या देवाच्या वर्षभर होणाऱ्या यात्रा-उत्सवामध्ये दसरा उत्सवाला विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे गुजरातमधील बडोदा, कर्नाटकातील म्हैसूर व महाराष्ट्रातील कोल्हापूर, कवठे एकंद येथील दसरा उत्सव प्रसिध्द आहेत. तसाच जेजुरीचा ऐतिहासिक मर्दानी दसराही आपले वेगळेपण टिकवून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील दसरा हा खऱ्या अर्थाने मराठेशाहीच्या स्मृती जागवणारा व पारंपरिक लोकसंस्कृतीशी नाते जपणारा आहे. तब्बल १८ तास डोंगरदरीच्या परिसरात चालणारा हा सोहळा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वीस वर्षांपूर्वी रात्रभर डोळे भरून पाहिला आणि त्यांच्या तोंडून सहजच शब्द आले हा साधासुधा दसरा नाही हा तर शिवशाहीची आठवण करून देणारा ‘मर्दानी दसरा.’  त्या वेळेपासून जेजुरीच्या दसऱ्याला ‘ मर्दानी दसरा’ हे नाव पडले. मध्यरात्रीचे चांदणे, गार वाऱ्याची मंद झुळूक, कडेपठारच्या डोंगरदरीतील ‘रमणा ’ या ठिकाणी हजारो भाविकांच्या भक्तिप्रेमाला आलेले उधाण, सदानंदाचा येळकोट असा जयघोष करीत भाविकांकडून होणारी पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण. काळोख्या रात्रीला छेदून आकाशाकडे झेपावणाऱ्या रंगीत तोफा, दरीमध्ये घुमणारा फटाक्यांचा आवाज, या साऱ्या भारलेल्या वातावरणात आपण सारी रात्र डोंगरात काढली हे लक्षातही येत नाही. आश्विन शुध्द प्रतिपदेला सनई-चौघडय़ाच्या मंगल स्वरात खंडोबा गडावरील नवरात्र महालात घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या दिवसात पारंपरिक कलावंत व वाघ्या-मुरळी गायन व नृत्य करतात. नेत्रदीपक विद्युत रोषणाईने सारा गड रात्रीच्या वेळी उजळून निघतो. राज्यातील अनेक कलावंत येथे हजेरी देण्यासाठी येतात. यावेळी शाहीर राम मराठे, सगनभाऊ, होनाजी बाळा यांची कवने, लावण्या म्हणून देवाचे मनोरंजन केले जाते. रात्री अकरानंतर घडशी समाजातील कलावंत सनई-चौघडय़ाचे वादन करतात. यामुळे साऱ्या जेजुरीत चतन्याचे वातावरण असते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dussehra festival celebration in jejuri
First published on: 30-09-2017 at 02:58 IST