तुळजाभवानीच्या मंदिरावर पहिले किरण पडते तेव्हा कुंकाची उधळण होते. संबळ कडाडत असते. आई राजा उदो, उदोचा गजर होतो. जणू एका युद्धाची एक रणधुमाळी सुरू आहे, असे वातावरण. मंदिरचा भवताल लालेलाल झालेला असतो. तत्पूर्वी तुळजाभवानीच्या मूर्तीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. देवीचे महात्म्य सांगणारी कवन म्हटली जात असतात. आपटय़ाची पान मग सोने म्हणून अर्पण करायची तेव्हाच सिमोल्लंघन पूर्ण झालेले असते. एका युद्धातून माणूस बाहेर पडल्यानंतरचा शीण आणि युद्ध जिकल्यानंतरचा आनंद हे तुळजापूरच्या विजयादशमीचे खास वैशिष्टय!

महिषासूराचा वध केल्यानंतरचा आनंदोत्सव साजरा करण्याच्या दिवस म्हणजे दशमीचा विजयोत्सव म्हणजे दसरा. हा सण साजरा करण्याच्या तुळजापूरच्या परंपराही वेगळया. नवरात्रीपूर्वी युद्धाच्या तयारीसाठी तीन दिवस आधी देवीच्या मूर्तीची निद्रा सुरू असते. त्याला मंचकी निद्रा म्हणतात. तुळजापूरमध्ये देवी मूर्ती प्रत्यक्ष मंचकावर आडवी झोपवली जाते. मग, नऊ दिवस युद्धाचे. महिषासुराचा वध होतो आणि दसरा साजरा होतो. हा सण साजरा करण्यासाठी नगर जिल्ह्यातून पलंग पालखी पाठविली जाते. नगर जिल्ह्यातील भिंगार नावाच्या  गावातून पलंग व पालखी मंदिरामध्ये आणली जाते. कल्लोळतीर्थजवळील पायऱ्यावर पलंग पालखी थांबते. या पायऱ्या खडय़ा आहेत. हजारो लोक या ठिकाणी जमतात. वाटते एखादा जरी खाली पडला तर चेंगरतील सारे. समोर अनेक संबळ वाजत असतात. आसमंतात त्याचा आवाज घूमत असतो. काही जण पोत खेळत असतात. एका मोठय़ा कपडय़ाच्या गुंडाळीला आग लाऊन तो सातत्याने आडवा हलवत राहणे, याला पोत खेळणे म्हणतात. आई राजा उदो उदोचा गजर होतो आणि असंख्य माणसे त्या खडय़ा पायऱ्या उतरु लागतात. हे सारे सुरू असताना तुळजाभवनीच्या मंदिरामध्ये मूर्तीला साडय़ा गुंडाळल्या जात असतात. १०८ साडय़ां गुंडाळून मूर्तीचे संरक्षण व्हावे, असा हेतू. तत्पूर्वी एक बकऱ्याचा बळी दिला जातो. त्या रक्ताचा टिळा लावणारेही भाविक आहेत. मंदिरामध्ये एक पिंपळाचे मोठे झाड आहे. त्याला एक पार आहे. त्या पिंपळपारावर पलंगपालखीमध्ये मूर्ती ठेवलेली असते. मूर्तीला हात लावण्याचा अधिकार तुळजापूरमध्ये फक्त बारा घरांना आहे. कदम घरण्याकडे हा मान. त्यामुळे मूर्तीच्या संरक्षणासाठी तरुणांचा गराडा असतो.  दंडातील बेटकुळी ज्याची अधिक मोठी अशा तरुणांची एक साखळी तयार केली जाते. नगरमधून आलेलेही भाविकही असेच तगडे. त्यामुळे दर्शनाच्या वेळी आणि प्रदक्षिणेच्या वेळी मोठी रेटारेटी असते. कोणता माणूस कोणत्या गावाचा हे ओळखायला यावे म्हणून दंडाला पट्टयाला बाधलेल्या असतात. मग पालखी उचलली जाते. कोणी ती उचलायचे, याचे ज्याचे त्याचे मान ठरलेले असतात. जिल्हाधिकारी किंवा महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा सुरू असतो. प्रदक्षिणा मार्गासाठी एक दोर हातात घेऊन सुरक्षा रक्षक उभे असतात. मग गजर होतो जगदंबेचा-‘ आई राजा उदो, उदो’! गर्दी चालू लागते. या गर्दीत सहभागी होणाऱ्याला स्वत:हून चालावे लागत नाही. आपोआपच  जातो तो पुढे. कुंकवाची उधळण सुरू असते. हा सारा विधी पहाटे पाच- साडेपाचपर्यंत चालतो. पहाट होते ती विजयाची असते. सारे वातारण भारुन टाकणारे असते. सर्वत्र लाल भडक कुकू दिसत असते. जणू युद्धातील रक्तसडाच. सारे अंगरणधुमाळीने माखलेले असते. प्रत्येकजण लालेलाल झालेला असतो. सतत आई राजाचा गजर चाललेला असतो. या वेळी जूना पलंख आणि पालखी तगडे जवान मोडून काढतात. ती लाकडे मग होमकुंडात समर्पित केली जातात. हा उत्सव म्हणजे महिला राजा असण्याचा उत्सव. त्यामुळेच तुळजापूरचा दसरा महोत्सवचा मोठा विलोभनीय्!

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न