शहरातील सर्वच भागांच धुळीच्या प्रमाणात वाढ; डोळ्यांच्या, श्वसनाच्या आजाराने नागरिक हैराण

प्रसेनजीत इंगळे, विरार

वसई-विरार शहरातील धुळीच्या प्रदूषणात वाढ झाल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने दिला आहे. यामुळे वसईकरांना श्वसन आणि डोळ्यांच्या आजाराचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून आलेल्या आकडेवारीनुसार वसईच्या वातावरणात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पी एम २.५ आणि पी एम १० या घातक कणांचे हवेतील प्रमाण वाढले आहे. २५ नोव्हेबर रोजी दुपारी २ च्या दरम्यान हे प्रमाण पी एम २.५ चे ३४८ मायक्रोग्राम क्युबिक मीटर तर पी एम १० चे प्रमाण २११ मायक्रोग्राम क्युबिक मीटर आढळून आले आहे. ही आकडेवारी धोकादायक असून यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होते अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अमर दुर्गले यांनी सांगितले की, धुळीच्या प्रमाणाची आकडेवारी चिंताजनक आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे शहरातील अस्वच्छ रस्ते आणि त्यावरील वाढता वाहनाचा प्रवास हे आहे. हे धूलिकण सततच्या हवेतच राहतात. यामुळे धुळीची चादर निर्माण होते.

शहरातील वाढती बांधकामे, वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडी ही एरव्ही सहज लक्षात न येणारी कारणेही पर्यावरणाच्या ऱ्हासाला मोठय़ा प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत. त्यातच वसई-विरार शहरात असणाऱ्या रासायनिक कंपन्यांचे प्रदूषण प्रकरण दर दिवशी गाजत आहे. यावर पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करते. मात्र पर्यावरणाच्या प्रदूषणासंदर्भात महापालिका उदासीन असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या शहरामध्ये धुळीचे प्रमाण महामार्गावर सर्वाधिक पाहायला मिळत आहे. महामार्गावर धुळीची चादर इतकी दाट असते की, वाहनचालकाला रात्रीच्या वेळी धुलीकणामुळे रस्ता दिसत नाही यामुळे अपघाताचीही शक्यता निर्माण झालेली आहे.

विरारमधील डॉ. आंनद जयपुरिया यांनी दिलेली माहिती अधिक धक्कादायक आहे, त्यांनी सांगितले की, प्रदूषणामुळे डोळ्यांचे विकार वाढत आहेत. त्यांच्याकडे दररोज डोळ्यात खाज सुटणे, जळजळ होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे सुजणे अशा तक्रीरी घेऊन  ३० ते ४० टक्के रुग्ण म्हणजे दिवसाला १० ते १५ रुग्ण दाखल होत आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे दुचाकीचालक असल्याने त्यांच्या डोळ्यांना प्रदूषित हवेचा सरळ संपर्क येत असल्याने अशा रुग्णांत वाढ होत आहे.

या धुळीचा नागरिकांनाही त्रास होत आहे. वाहनचालकांना वाहने चालवताना हा त्रास जाणवतो. याबाबत विरार येथे राहणारे समीर जाधव यांनी सांगितले की, केवळ अर्धा तास जरी दुचाकीने प्रवास केला आणि नंतर रुमालाने तोंड पुसले तर एक काळ्या रंगाचा थर चेहऱ्यावर जमा झालेला असतो.

वसईतील प्रदूषणाची समस्या गंभीर झालेली आहे. रस्ते धुळीने माखलेले आहेत. महापालिकेने रस्त्यावर पाणी मारून धूळ नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

– अमर दुर्गृले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी