प्रत्येक पोलिसासह त्याच्या कुटुंबाने एक झाड दत्तक घ्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. त्यासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कराड पोलीस वसाहतीमध्ये सिल्व्हर ओकची सुमारे २५० झाडे लावण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस निरीक्षक विकास धस, अण्णासाहेब मांजरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
डॉ. अभिनव देशमुख म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कराड तालुका आणि शहर पोलीस ठाण्यांनी ५०० झाडांचे वृक्षारोपण करून आदर्श घालून दिला आहे. उंब्रज, तारळेसह अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा आमच्या सहकाऱ्यांचा मनोदय आहे. वृक्षारोपणासाठी पुढाकार घेणाऱ्या हवालदार मारुती चव्हाण यांची डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रशंसा केली.
राजलक्ष्मी शिवणकर यांनी नांदगावसह कराडच्या पोलीस वसाहतीमध्ये करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाची माहिती दिली. त्याचबरोबर भविष्यातील उंब्रज पोलीस ठाण्यांतर्गत मसूर, तारळे दूरक्षेत्र परिसरात वृक्षारोपणासाठी तयार केलेल्या योजनांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
विकास धस यांनी डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने एक झाड दत्तक घेण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन करत वृक्षारोपणासाठी सहकार्य करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.