ग्रामपंचायत ते राज्य विधिमंडळ आणि संसदेपर्यंत साडेतीन दशकांपेक्षा अधिक काळ राजकीय क्षेत्रात असणाऱ्या भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांचा या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल का, याबद्दल त्यांच्या समर्थकांत चांगलीच उत्सुकता आहे.
सन १९८० मध्ये भोकरदन सरपंचपदी निवड, १९८५मध्ये भोकरदन विधानसभेची पहिल्यांदा निवडणूक लढविली. भाजपकडून मैदानात उतरलेल्या दानवेंना या निवडणुकीत अवघ्या १ हजार ५६८ मतांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, या पराभवानंतर त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला. त्याचे फळ त्यांना १९९०च्या निवडणुकीत मिळाले. त्या वेळी २५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होत ते विधानसभेत पोहोचले. १९९५मध्ये पुन्हा २१ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून गेले. १९९९मध्ये पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि काँग्रेसच्या उमेदवारास जवळपास १ लाख २४ हजारांच्या मताधिक्याने पराभूत करून विजयी झाले. त्यानंतर २००४, २००९ व आता सलग चौथ्यांदा ते खासदार झाले आहेत.
संसदीय राजकारणाचा दांडगा अनुभव असणाऱ्या दानवेंनी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेच्या राजकारणावर नेहमीच नियंत्रण ठेवले. भोकरदनचे नगराध्यक्षपद अनेक वर्षे त्यांच्या नियंत्रणाखाली होते. शिवसेनेसोबत युती असल्याने जालना नगर परिषदही अनेक वर्षे त्यांच्या नियंत्रणाखाली होती. जिल्हा परिषद, भोकरदन तसेच जाफराबाद पंचायत समित्यांवर काही अपवाद वगळता त्यांचे अधिपत्य राहिले. सहकार क्षेत्राचे महत्त्व ओळखून असणारे दानवे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व सध्या संचालक आहेत. रामेश्वर सहकारी साखर कारखान्यांची उभारणी करून अनेक वर्षे अध्यक्षपदी राहिले. आता अध्यक्षपद त्यांच्या मुलाकडे आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्थेचा कारभारही मोठा आहे.
सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, वीज, स्थानिक स्वराज्य संस्था आदी विभागांतील निर्णयप्रक्रियेची नेमकी माहिती असल्याने एखाद्या कामाच्या अंमलबजावणीत पाणी कुठे मुरते हे त्यांना पक्के समजते. ग्रामीण पाणीपुरवठय़ापासून ते सार्वजनिक वितरण व्यवस्थेपर्यंतची माहिती असणाऱ्या दानवेंना यामुळेच प्रशासकीय यंत्रणा वचकून असते. निवडणुका जिंकण्याचे कसब अंगी बाळगणारे दानवे कुशल संघटक असून खास ग्रामीण ढंगाची वक्तृत्वशैली त्यांच्याकडे आहे. निवडणूक असो किंवा अन्य कोणताही कार्यक्रम, तो पूर्णत्वास नेण्याची त्यांची वैयक्तिक पातळीवरीलही यंत्रणा असल्याने अनेकदा ते बेदरकारही होतात. परंतु राजकारण, शिक्षण, सहकार आदी क्षेत्रांत एवढे यश मिळवूनही भाजप पक्षसंघटनेत त्यांना पाहिजे तेवढे महत्त्व दिले जात नाही, याची खंत मात्र अनेक कार्यकर्त्यांना आहे. पक्षाने त्यांना राज्यपातळीवर उपाध्यक्ष किंवा सरचिटणीस केले. परंतु त्यांचा विचार अध्यक्षपदासाठी कधी झाला नाही. या वेळेस केंद्रात राज्यमंत्रिपद तरी मिळेल का, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.