News Flash

संमेलनाच्या मांडवातून : ‘आजी’चा वसा ‘माजी’च्या हाती!

कधी नव्हे ते या संमेलनात चार माजी संमेलनाध्यक्ष पूर्णवेळ सहभागी आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

शफी पठाण

घेतला वसा टाकू नये म्हणतात.. परंतु कधी-कधी काही गोष्टी अशा अनपेक्षित घडतात की घेतलेला वसा अगदी सोडता येत नसला तरी नाइलाजाने बाजूला मात्र ठेवावा लागतो. संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटो यांच्याबाबतीत असेच घडले. ऐन संमेलनाच्या काळात पाठीचे दुखणे वाढल्याने त्यांना संमेलन मध्येच सोडून मुंबई गाठावी लागली. संमेलनाध्यक्षांशिवाय संमेलनाचा एक अपवाद सोडला, तर इतिहास नाही. तो अपवाद आनंद यादवांचा आहे. महाबळेश्वरला साहित्य संमेलन भरले होते. आनंद यादव संमेलनाचे अध्यक्ष होते; परंतु त्यांच्या ‘संतसूर्य’ या कादंबरीवरून वादाचे मोहळ उठले आणि त्यांना संमेलनाआधीच नियोजित अध्यक्षपद सोडावे लागले. त्यानंतर आता फादर दिब्रिटो यांना आजारपणामुळे संमेलन अर्ध्यावर सोडावे लागले. सध्या संमेलनाला अध्यक्षच नसल्याने ते जरा सुनेसुने झाले आहे; परंतु हे सुनेपण जाणवू  नये म्हणून की काय अनपेक्षितपणाच्या या क्रमात आणखी एक अनपेक्षित गोष्ट आपोआपच घडत आहे. कधी नव्हे ते या संमेलनात चार माजी संमेलनाध्यक्ष पूर्णवेळ सहभागी आहेत. यामध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. अक्षयकुमार काळे, लक्ष्मीकांत देशमुख आणि अरुणा ढेरे यांचा समावेश आहे. ते आज संमेलनाचे अध्यक्ष नसले तरी त्यांच्याबद्दलचे आकर्षण व आदर अर्थातच कायम आहे. प्रत्येक संमेलनात अध्यक्षांबरोबर आपले एक छायाचित्र असावे म्हणून अनेक जण धडपडत असतात. परिसंवादात आपले भाषण सुरू असताना, काव्यसंमेलनात कविता वाचली जात असताना वा एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन सुरू असताना संमेलनाध्यक्ष सोबत असावे, असे त्या त्या कार्यक्रमात सहभागी प्रत्येकाला वाटत असते; परंतु फादर दिब्रिटो आजारी असल्याने ही सुज्ञ मनीषा वास्तवात उतरणे अशक्य. अशा वेळी संमेलनात सहभागी माजी अध्यक्ष नकळतपणे अनेकांच्या या सुज्ञ मनीषेला वास्तव रूप प्रदान करीत आहेत. डॉ. नागनाथ कोतापल्ले आणि डॉ. काळे यांचा स्वभाव काहीसा मितभाषी आहे. त्यामुळे ते फारसे संमेलनातील गर्दीच्या गराडय़ात दिसत नाहीत; परंतु त्यांचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे. या दोघांचाही पिंड मूळ समीक्षकाचा आहे आणि आज दर्जेदार समीक्षा दुर्मीळ झाली आहे. त्यामुळे ते भेटतील तिथे चर्चेचा एक गंभीर फड आपोआपच जमत आहे.

यात एका माजी संमेलनाध्यक्षांचा उत्साह मात्र अधोरेखित करण्यासारखा आहे. ते आहेत बडोद्याच्या संमेलनातून ‘राजा, तू चुकतोयस..’ अशा शब्दांत सरकारला खडसावणारे डॉ. लक्ष्मीकांत देशमुख. त्यांचा संमेलनात चौफेर वावर सुरू आहे. ते स्वयंप्रेरणेने अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. ते जातील तिथे त्यांना छायाचित्रासाठी आग्रह होतोय. तेही आनंदाने कॅमेऱ्यांना सामोरे जात आहेत. छायाचित्रासाठीची ही स्पर्धा अरुणाताईंचाही पिच्छा सोडताना दिसत नाही. उर्वरित महाराष्ट्रातील ताईंच्या प्रशंसकांसारखे अनेक जण या संमेलनातही आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून यवतमाळातील त्यांचे दीर्घ भाषण असो की माजी संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांनी काल उस्मानाबादेत दिलेले लघु भाषण असो, त्या भाषणाचा नाद आणि लयीचा प्रभाव श्रोत्यांच्या मनावर आजही कायम आहे. त्या प्रभावातूनच अरुणाताईंच्या सभोवताली त्यांच्या चाहत्यांचा गराडा पडतोय. खरे तर हे चित्र दरवर्षी आजी संमेलनाध्यक्षांच्या बाबतीत दिसते; परंतु यंदा ‘आजी’ संमेलनाध्यक्षांचा हा वसा ‘माजी’ संमेलनाध्यक्षांकडून असा अप्रत्यक्षरीत्या पुढे नेला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 1:15 am

Web Title: earlier president in akhil bhartiy marathi sahitya sammelan 2020 abn 97
Next Stories
1 कोणतीही ‘भूमिका’ न घेण्याच्या भूमिकेवर महामंडळ ठाम!
2 कवितांची निर्मिती वाढली, पण गुणवत्ता घटली
3 २१ व्या शतकातील वास्तववादी लिखाणाने समाज समृद्ध!
Just Now!
X