राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याची ऑफर दिली होती,” असं पवार या मुलाखतीत म्हणाले होते. भाजपाऐवजी शिवसेनेसोबत जाण्याचा पर्याय का निवडला या प्रश्नावर बोलताना पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार यांनी एनडीटीव्हीला वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी पवार म्हणाले, “आमच्यासाठी शिवसेनेसोबत काम करणे सोप्प आहे. पण भाजपासोबत काम करणे शक्य नाही. हिंदुत्व ही जरी शिवसेनेची विचारधारा आहे. त्यांनी ती कधीही लपवलेली नाही. पण, हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेना कधीही प्रशासनाच्या आणि निर्णयाच्या प्रक्रियेत आणणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारचा ते मूळ आहे,” असं पवार म्हणाले.

भाजपाकडून आलेली ऑफर नाकारण्याविषयी पवार म्हणाले, “आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. पण, राष्ट्रीय हित असेल तर नक्कीच भाजपाला सहकार्य करू. तिथे मी राजकारण मध्ये आणणार नाही. आमचा पक्ष आहे. आमची काँग्रेससोबत आघाडी आहे. त्यामुळे ती तोडण्याचा प्रश्नच येत नाही,” असंही पवार म्हणाले.

“अवकाळी पावासामुळे राज्यात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी आणि केंद्र सरकारने यासाठी महाराष्ट्राला मदत करायली हवी, हे सांगण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतली होती. त्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी आपण एकत्र काम केल्यास मला आनंद होईल, असं म्हटलं होतं. मात्र, मी त्यांना विनम्रपणे हे शक्य नसल्याचं सांगितलं,” असा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट शरद पवार यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता.