धानपट्टा असलेल्या पूर्व विदर्भाला यंदाच्या खरीप हंगामात लहरी व कमी पावसाची मोठी झळ बसली असून धान, सोयाबीनसह पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. यंदा दुबार, तिबार पेरणी करावी लागल्याने बळीराजाचे गणित कोलमडले असून संत्र्यासह फळ उत्पादकही अडचणीत सापडला आहेत.
पूर्व विदर्भात यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबपर्यंत सरासरीच्या ६८ टक्के (७९७ मि.मी.) पावसाची नोंद झाली. त्यात सप्टेंबरमध्ये ७० टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षीपेक्षा याच कालावधीत १३० टक्के पाऊस झाला होता. चंद्रपूर जिल्ह्य़ात ६० टक्के, भंडारा ६२ टक्के, गडचिरोली ७५ टक्के, वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्य़ांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. कमी पावसामुळे अनेक भागात शेती उत्पादन आणि नियोजनावर परिणाम झाला आहे. पूर्व विदर्भातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये ७८ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ८० टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा आहे. अनेक शहरे पेयजलासाठी सिंचन प्रकल्पांवर विसंबून आहेत. पूर्व विदर्भाचे रब्बी पिकांचे क्षेत्र ४ लाख १३ हजार हेक्टर आहे. आतापर्यंत रब्बीची केवळ ५ टक्के पेरणी झाली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे धान उत्पादक जिल्हे असून कमी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील उभे धान पीक करपले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ४० टक्क्यांनी धानाचे उत्पादन घटणार आहे. यावर्षी धान खरेदीची समस्याही निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी भावाने व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागत आहे. या हंगामात शेतकऱ्यांनी बँक व सावकारांकडून कर्ज घेतले. मात्र, पुरेशा पावसाअभावी दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत असल्याने ओलित करणारा शेतकरीही अडचणीत सापडला. उशिरा पावसामुळे विदर्भातील संत्र्याला मृगबहार फारच कमी, तर आंबियाबहरची उष्ण हवामानाने गळती झाल्याने संत्री उत्पादकही मोठय़ा अडचणीत आला आहे.
कापसाला कमी भाव
पावसामुळे कापसाची उशिरा पेरणी झाली आणि लवकर पाऊस गेल्याने ६-७ क्विंटल प्रती एकर होणारे उत्पादन यंदा अध्र्यावर आले आहे. गेल्या वर्षी कापसाचे भाव ५५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत गेले होते. यंदा बाजारात भाव ३५०० ते ४ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत आहेत. केंद्र सरकारने यंदा ४ हजार रुपयांवर फक्त ५० रुपये वाढवून ४०५० रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केले आहेत. उत्पादन खर्च ६ हजार रुपयांवर असताना हमीभाव ४०५० रुपये निश्चित करण्यात आल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
उत्पादनात घट अपेक्षित
अनियमित व कमी पावसाचा पिकांच्या उत्पादकतेवरही परिणाम झाला आहे. त्याचा धान व सोयाबीनला अधिक फटका बसला आहे. विभागात सध्या पिकांची काढणी सुरू आहे. कृषी विभागाकडून मंडळनिहाय उत्पादनाची माहिती गोळा केली जात आहे. यंदा उत्पादनात २० टक्के घट अपेक्षित आहे. शासनाने पूर्व विदर्भातील ७९६० गावांची आणेवारी जाहीर केली असून ती ५० पैशांपेक्षा जास्तच आहे.