जगभरात कहर माजवलेल्या आणि हजारो लोकांचे प्राण घेतलेल्या इबोला आजाराचा संशयित रुग्ण पनवेलमध्ये आल्याच्या नुसत्या वार्तेने मंगळवारी अख्ख्या गावभर अक्षरश गलबला झाला. एरवी सुशेगाद असलेल्या आरोग्य खात्याच्या यंत्रणाही त्यामुळे खडबडून जाग्या झाल्या आणि पोलिसांप्रमाणे संशयित रुग्णाचा शोध घेऊ लागल्या. एवढी सगळी धावाधाव करूनही रुग्ण त्याच्या निवासी पत्त्यावर सापडलाच नाही. मात्र, इबोलाच्या या संशयित रुग्णाची चर्चा पनवेलमध्ये दिवसभर रंगली होती.
सिंगा रोयन अँथनी एडिकोस्टा, असे भारदस्त नाव असलेली मूळ नायजेरियन वंशाची व्यक्ती भारतात आली असून ती पनवेलच्या दिशेने रवाना झाल्याची वार्ता आरोग्य खात्याला समजली. तातडीने कामाला लागलेल्या या यंत्रणेने एडिकोस्टा यांच्या पारपत्रावर नमूद असलेल्या ३०२-५, विश्राळी नाका, पनवेल या पत्त्यावर आपले अधिकारी-कर्मचारी सर्व लवाजम्यासह पाठवले. प्रत्यक्षात या पत्त्यावर एडिकोस्टा राहातच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एडिकोस्टा यांच्यावरील संशय आणखीनच बळावला. पनवेलमध्ये राहात नाही तरी पारपत्रावर पत्ता कसा, असा सवाल करत आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी पोलीस पथकासारखे एडिकोस्टांचा शोध घेण्यासाठी  फिरू लागले. मात्र, तरीही एडिकोस्टांचा ठावठिकाणा न लागल्याने तसा संदेश मोबाइलवर राज्यभर धाडण्यात आला.
अखेरीस एडिकोस्टा हे तामिळनाडूला गेल्याचे समजले. मग आरोग्य खात्याच्या पथकाने तामिळनाडूतील वेल्लयूर नेल्लई हे गाव गाठले. त्या ठिकाणी गेल्यावर नेमका खुलासा झाला. एडिकोस्टा प्रत्यक्षात नायजेरियन वगैरे नसून अस्सल भारतीय आहेत हे स्पष्ट झाले. त्यांच्या कंपनीने त्यांना नायजेरियात कामासाठी पाठवले होते. त्यातच पारपत्र काढले त्यावेळी त्यांचा निवास पनवेलात होता, याचाही खुलासा झाला. आणि अखेरचा आणि महत्त्वाचा खुलासा झाला, तो म्हणजे एडिकोस्टासाहेबांना काही इबोला वगैरे झालेला नाही. आपल्याला झालेल्या कथित इबोलाने पनवेलमध्ये एवढा गलबला झाल्याचे ऐकून एडिकोस्टांनी कपाळावर हात मारून घेतला!

माझ्या आईचे दहा दिवसांपूर्वी निधन झाल्याने मी नायजेरियातून सुटी घेऊन आलो. त्यावेळी विमानतळावर आरोग्याच्या सर्व चाचण्या मी पार पाडल्या होत्या.    -सिंगा एडिकोस्टा

नायजेरियातून आलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर ३० दिवस लक्ष ठेवले जाते. त्यासाठी सिंगा यांना शोधण्याची धावपळ करण्यात आली.    – डॉ. अजित गवळी, शल्यचिकित्सक, रायगड</strong>