३०० महिलांना रोजगार; ५० हजार स्वदेशी राख्या तयार करणार

रमेश पाटील,  लोकसत्ता

वाडा:  करोना विषाणूच्या संसर्गामुळे लागू असलेल्या टाळेबंदीत उद्योगधंदे, बाजारपेठा, लहान व्यवसाय बंद झाल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत न  डगमगता विक्रमगड  तालुक्यातील नऊ गावांतील ३०० महिलांनी प्रशिक्षण घेऊन बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे  त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन तसेच सध्या चीन सोबतच्या बिघडत्या संबंधामुळे स्वदेशी वस्तूंची पर्यायी बाजारपेठ निर्माण करून चिनी वस्तूंना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी या ग्रामीण भागातील महिला एकवटल्या आहेत.   आगामी रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठेत विक्रीसाठी येणारम्य़ा चायनीज राख्याना टक्कर देण्यासाठी या महिलांनी बांबूपासून पर्यावरणपूरक अशा ५० हजार स्वदेशी राख्या निर्मितीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून त्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. करोना या विषाणुच्या संरक्षणासाठी एकमेकींपासून सुरक्षित अंतर ठेऊन मास्कचा वापर करून या महिला या उद्योगात दिवस-रात्र कष्ट करीत आहेत. तसेच आगामी काळात येणाऱ्या गणपती, नवरात्र आणि दिवाळी सणांसाठी लागणारे आकर्षक मखर आणि आकाश कंदील बांबूपासून बनविण्याचा त्यांचा मानस आहे.

केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पाच्या माध्यमातून विक्रमगड, वाडा, जव्हार या तालुक्यांतील दुर्गम आदिवासी भागांत पर्यावरणपूरक असे विविध सेवाभावी प्रकल्प स्थानिकांच्या सहकार्याने राबविले जात आहेत. यामध्ये महिला सक्षमीकरण, वृक्ष लागवड, सेंद्रिय शेती इत्यादी ध्येय समोर ठेवून ‘प्रोजेक्ट ग्रीन गोल्डची’ सुरुवात केली आहे. या कामी  प्रकल्पाचे प्रमुख विमल केडिया, संयोजक अरविंद मार्डीकर, गौरव श्रीवास्तव, संतोष गायकवाड हे अथक परिश्रम घेत आहेत.

आदिवासी, दुर्गम भागातील बेरोजगार तरुणांना तसेच येथील महिलांना सध्या कुठलाही रोजगार उपलब्ध नाही. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी केशवसृष्टी या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

-संतोष गायकवाड , पदाधिकारी, केशवसृष्टी सेवाभावी संस्था.