08 March 2021

News Flash

बाजाराअभावी शेतकऱ्यांची आर्थिक घुसमट

शेतमाल विक्रीची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी रस्त्यावर मिळेल त्या भावात शेतमाल विकत आहेत.

संग्रहित छायाचित्र

टाळेबंदीतील निर्बंध टप्प्याटप्प्याने सैल करण्यात येत असले तरी भाजीविक्रीचे बाजार अजूनही बंद ठेवण्यात आल्यामुळे वसईच्या पश्चिम पट्टय़ातील शेतकऱ्यांना मोठय़ा आर्थिक तोटय़ाला सामोरे जावे लागत आहे. भाजीपाल्याचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला असला तरी अधिकृत बाजार बंद असल्याने आणि शेतमाल विक्रीची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी रस्त्यावर मिळेल त्या भावात शेतमाल विकत आहेत.

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील रानगाव, भुईगाव, गास, नवाळे, वाघोली, मर्देस, नाळा, राजोडी, वटार, नंदाखाल, आगाशी अशा विविध गावांमधून मोठय़ा प्रमाणात शेतकरी भाजीपाला पिकवतात. यातील बराच शेतमाल हा निर्मळ आणि सोपाऱ्याच्या बाजारपेठांमध्ये विक्रीकरिता जातो. या दोन्ही बाजारांमध्ये मुंबईपासून डहाणूपर्यंतचे व्यापारी येत असल्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळतो. त्यातून स्थानिक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. मात्र, टाळेबंदीपासून हे दोन्ही बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून तर काही वेळा भ्रमणध्वनीद्वारे वैयक्तिक संपर्कातील व्यक्तींना मिळेल त्या भावात भाजीपाला विकावा लागत आहे.

नालासोपारा पश्चिमेला सोपारा बाजाराजवळ नालासोपारा पोलीस ठाण्याच्या मागे भाजीपाला विक्रीकरिता खुल्या मैदानात महापालिकेने जागा दिली असली तरी आता या मैदानात चिखल झाला आहे. शिवाय हे मैदान पश्चिम पट्टय़ातील शेतकऱ्यांना प्रवासाच्या दृष्टीने गैरसोयीचे होते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे अंतरनियमाचे पालन होईल, अशा प्रकारे निर्मळ आणि सोपारा बाजार सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. ‘भुईगाव फाटय़ावर महापालिकेची जवळपास तीन एकर जागा आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या सोयीकरिता पालिकेने या जागेवर बाजार सुरू करावा’, अशी मागणी शिवसेनेचे निर्मळ शाखाप्रमुख सुधीर शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, कृषी अधिकारी राहुल शिरसाठ यांनी सांगितले की, मी उद्या वसईच्या तहसीलदारांशी यासंदर्भात बोलून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना सांगणार आहे.

करोनाच्या सावटामुळे भाजीपाला पोहचवणे धोक्याचे

वसईच्या पश्चिम पट्टय़ात शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक तरुण शेतकऱ्यांनी पालक, मिरची, चवळी, कोथिंबीर, वाल, दुधी, टोमॅटो, भेंडी अशा विविध भाजीपाल्याची लागवड केली आहे. याशिवाय स्थानिक आणि शहरी बाजारपेठेत विकण्यासाठी केळी आणि इतर फळांचीदेखील लागवड केल्याचे आढळून येते. भाजीपाला आणि फळांची ग्राहक संख्या ही शहरात सर्वाधिक आहे. मात्र, वसई-विरार शहरात करोनाचे संकट अधिकाधिक गडद होऊ  लागल्याने शहरात भाजीपाला पोचविणे शेतकऱ्यांना जिकिरीचे आणि धोक्याचे वाटू लागले आहे. यामुळे शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:13 am

Web Title: economic infiltration of farmers due to lack of market abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भरवस्तीत टाकाऊ रसायन सोडण्याचा प्रकार
2 भाडेतत्वावरील खरेदीची उलटतपासणी
3 यवतमाळमध्ये नाल्याच्या पुरात चौघे वाहून गेले
Just Now!
X