|| विश्वास पवार, लोकसत्ता

करोना प्रादुर्भावानंतर मंदिरे खुली करण्यात आली. पण जत्रांना बंदी कायम आहे. सातारा जिल्ह्य़ातील मांढरदेव, खंडोबाची पाली या मोठय़ा जत्रांबरोबर अनेक छोटय़ामोठय़ा जत्रा, यात्रा, छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांवर झाला असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्याचा परिणाम स्थानिक ग्रामीण अर्थकारण बिघडून या सर्वाना त्याची झळ सहन करावी लागत आहे.

सातारा जिल्ह्य़ात डिसेंबर जानेवारी महिन्यापासून यात्रा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरे करण्यात येतात. या यात्रांना राज्य परराज्यातून मोठय़ा प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र या वर्षी करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर यात्रांवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. म्हसवड येथील सिद्धनाथ, फलटण येथील राम, कोरेगाव येथील भैरवनाथ सेवागिरी रथोत्सव रद्द झाले आहेत. सेवागिरी रथोत्सवात परकीय चलनाची तोरणेही बांधली जातात.

याबरोबरच पाल (ता. कराड) येथील खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा, चाफळ येथील श्री राम सीतामाई महोत्सव, मांढरदेव येथील काळेश्वरी यात्रा, औंधच्या यमाई देवीची यात्रा या प्रसिद्ध यात्रा रद्द झाल्या आहेत . या वर्षी करोना प्रादुर्भाव व टाळेबंदीमुळे मार्च-एप्रिलपासूनच्या सर्व यात्रा-जत्रा बंद आहेत. अनेक छोटे-मोठे व्यवसाय त्यांचा उदरनिर्वाह यात्रांवर अवलंबून असतो. यात्रांमध्ये मिठाई, खेळणी, कपडे, करमणूक आदी वेगवेगळी दुकाने येत असतात. कुस्त्यांचे फड आणि विविध स्पर्धा होत असतात. यात्रेनिमित्त शहरांमध्ये गेलेले नोकरदार आवर्जून कुटुंबासह गावी येतात, ग्रामदैवत, कुलदैवताचे दर्शन घेतात आणि पारंपरिक यात्रा उत्सवात उत्साहाने सहभागी होतात.

यात्रा म्हटलं, की भारूड, तमाशा यांसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा आणि पुन्हा रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे साधारण उत्सवाचे स्वरूप असते. यात्रांच्या निमित्ताने ग्रामीण भागात मोठी उलाढाल होते. यात्रा बंद झाल्यामुळे या व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आता जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. उद्योग व्यवसाय स्थिरावत आहेत. सर्व क्षेत्रांत कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. शाळा, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, धार्मिक व पर्यटनस्थळेही खुली झाली आहेत. दरवर्षी दिवाळीनंतर यात्रांचा व ग्रामदैवता यात्रांचा हंगाम सुरू होतो होतो. या वर्षी हंगाम सुरू झाला करोनाच्या भीतीमुळे. धार्मिक कार्यक्रम देवस्थान ट्रस्टच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडले जात आहेत. मात्र भाविकांच्या उपस्थितीवर, गर्दी करण्यावर, दुकाने लावण्यावर र्निबध लावण्यात आले आहेत. धार्मिक आणि सामाजिक बैठका, करमणूक कार्यक्रमांमध्ये मोठय़ा संख्येने लोक आल्यास प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची भीती आहे. त्यामुळे गावोगावच्या देवस्थान समितीच्या बैठका घेऊन ग्रामदेवांच्या यात्रा रद्द करण्याचे निर्णय होत आहेत. प्रशासनाने मंदिरे खुली केली पण यात्रा-जत्रा बंद आहेत. समाजामध्ये जनजागृती झाली असली तरी गावच्या देवस्थान समित्या स्वयंस्फूर्तीने बैठका घेऊन यात्रा रद्द करत आहेत.

फडमालकांचे नुकसान

यात्रा आणि तमाशा यांचं अनोखे नाते आहे. दरवर्षीच्या यात्रांमध्ये तमाशा, नाटक, चित्रपट दाखवले जातात. लोकनाटय़ तमाशामुळे ग्रामीण भागातील लोककलावंतांना रोजगार उपलब्ध होतो. या तमाशांमुळे लोककला टिकून राहिल्या. मागील वर्षांपासून तमाशा उद्योग बंद असल्याने फडमालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंतांना अगोदर उचल, कार्यक्रमासाठी दर्जेदार साहित्य, वाद्ये, लायटिंगसह अन्य वस्तूंची खरेदी करावी लागते. हा सर्व खटाटोप केल्यानंतर तमाशाचा फड उभा राहतो. त्यातूनही अनेकदा नैसर्गिक संकटामुळे कार्यक्रम रद्द होतात. त्याचाहा भरुदड फडमालकांवरच येऊन पडतो.

कुस्ती क्षेत्रालाही फटका

यात्रांच्या निमित्ताने नामवंत कुस्त्यांची मैदाने भरत असतात. करोनाचे ग्रहण कुस्ती क्षेत्र व मल्लानाही लागल्याचे दिसत आहे. मोठय़ा गावांतील यात्रांच्या अनुषंगाने नामवंत मैदाने लवकर होणार नसल्याने मोठा फटका बसणार आहे. उदयोन्मुख पैलवानांना सुरुवातीच्या काळात यात्रेची मैदानातून पुढे जाण्याचा मार्ग सापडतो व आपल्यातील गुणांचा आवाका येतो. करोनामुळे कुस्ती केंद्र बंद, कुस्त्यांची मैदाने रद्द, वर्षभराची मेहनत वाया गेली आहे.