शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले होते. त्यावर वर्षा राऊत यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आजच ईडी कार्यालयात हजर होत वर्षा राऊत यांनी सगळ्यांना धक्का दिला आहे. वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल होताना शिवसेनेकडू शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याची चर्चा होती. ती गर्दी व गोंधळ टाळण्यासाठीच वर्षा राऊत एक दिवस आधीच चौकशीसाठी हजर झाल्याचं बोललं जात आहे.

पीएमसी गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटीशीनंतर राऊत यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती.

याबद्दल संजय राऊत यांनीही माहिती दिली होती. वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितली होती. त्यामुळे त्या उद्या (५ जानेवारी) ईडीसमोर हजर होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र सोमवारी (४ जानेवारी) वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल झाल्या. त्यांची तीन तास चौकशी केली जाणार असल्याचं वृत्त आहे.

शक्ती प्रदर्शनाचं काय?

वर्षा राऊत यांना नोटीस आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर संताप व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनाही अशीच नोटीस आली होती. त्यामुळे वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर होण्यावेळी शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, संजय राऊतांनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं.