जळगाव : भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री  आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस दिली आहे. ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून त्यासाठी ३० डिसेंबर रोजी मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती खडसे यांनी शनिवारी येथे दिली.

खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश के ला आहे. शनिवारी येथील मुक्ताई या निवासस्थानी खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ईडीकडून शनिवारी नोटीस मिळाल्याचे सांगितले. ३० डिसेंबर रोजी मुंबईत चौकशीला बोलावण्यात आले आहे. चौकशीला आपण सामोरे जाणार असून ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भोसरीतील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील भूखंडाचा व्यवहार पत्नीच्या नावाने झाला आहे. त्यात आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.

आता याच भूखंडाच्या संदर्भात ईडीने नोटीस बजावली आहे. याच प्रकरणाची यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, प्राप्तीकर विभाग तसेच न्या. झोटिंग समितीकडून चार वेळा चौकशी झाली आहे. प्रत्येक वेळी आपण आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे सादर केली आहेत. आता ईडीकडून या प्रकरणाची चौकशी होणार आहे. ईडीलापण आधीच्या यंत्रणांप्रमाणे सहकार्य करू, असे खडसेंनी सांगितले.

विरोधकांना दडपण्यासाठी वापर – वडेट्टीवार

नगर : भाजप ‘ईडी’चा (सक्तवसुली संचालनालय) वापर विरोधकांसाठी शस्त्रासारखा करत आहे. विरोधकांचे आवाज दाबण्यासाठी करत आहे. ईडीचा असा राजकीय वापर भाजपला महागात पडेल, आज एकनाथ खडसे यांना नोटीस पाठवली, मी भाजपविरुद्ध बोलतो म्हणून मलाही ‘ईडी’ची नोटीस मिळेल. भाजपला हे महागात

पडेल. त्यामुळे भाजपने सत्तेचा गैरवापर टाळावा असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे दिला. मंत्री विजय वडेट्टीवार शनिवारी नगरमध्ये होते. त्यांच्या उपस्थितीत ‘ओबीसी, व्हीजे-एनटी’ चा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.