महापालिकेच्या शाळेतील २६ हून अधिक विद्यार्थ्यांना खिचडी खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण मंडळाने त्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न केले. खुद्द महापौरांनी विषबाधेचा प्रकार मान्य करत खिचडीचा दर्जा तपासणीत हलगर्जीपणा केल्यावरून मुख्याध्यापिकेस तडकाफडकी निलंबित केले. या घटनेमुळे पालिकेच्या अखत्यारीतील १२८ शाळांत दिल्या जाणाऱ्या खिचडीच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जुन्या नाशिकमधील पालिकेच्या शाळा क्र. ६२ मध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर सुमारे २६ विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले. शिक्षकांनी त्यातील नऊ जणांना पालिकेच्या जाकीर हुसेन रुग्णालयात दाखल केले. या घटनेची गंभीर दखल घेत सत्ताधारी मनसेच्या महापौरांनी कठोर धोरण स्वीकारले असताना शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दूषित पाणी प्यायल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला. महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी शाळा व रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी खिचडी खाल्ल्यामुळे विषबाधेचा प्रकार घडल्याचे नमूद केले.
या प्रकरणी मुख्याध्यापिका पुष्पा रावळ यांना निलंबित करतानाच खिचडी बनविण्याचा बचत गटाचा ठेकाही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महापौरांनी अशी स्पष्ट भूमिका घेतली असली तरी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही विषबाधा बांधकामासाठी ठेवलेल्या टाकीतील पाणी प्राशन केल्यामुळे घडल्याचा दावा केला. खिचडीमुळे ही विषबाधा झाली नसल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रथमदर्शनी अंदाज असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित शाळेतील खिचडीचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. पालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये खिचडी बनविण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा वापर केला जातो, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांनी केला. ही प्रक्रिया ज्या ठिकाणी पार पाडली जाते, तेथे कमालीची अस्वच्छता असते. या पाश्र्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.