प्रशांत देशमुख

शालेय शिक्षिकांना शारीरिक सक्षमता व आरोग्य क्षेत्राबाबत माहिती देण्यासाठी आयोजित प्रशिक्षणाबाबत शिक्षण विभागच अनभिज्ञ असल्याने या शिक्षिका एका चांगल्या उपक्रमाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र पुरस्कृत ‘फिट इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत देशभरातील शिक्षिकांसाठी ८ मार्चला जागतिक महिला दिनी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन आठवडय़ांचे हे ऑनलाईन प्रशिक्षण हिंदी व इंग्रजी भाषेत असून एकूण २८सत्रांत  होणार आहे. केंद्रीय युवक कल्याण व महिला व बालकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम राज्यांना राबवायचा आहे.

या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) मार्फ त प्रशिक्षणाची माहिती सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयांना दोन मार्चच्या पत्राद्वारे देण्यात आली. या प्रशिक्षणात जगभरातील उत्कृष्ट प्रशिक्षकांकडून शिकण्याची संधी शिक्षिकांना उपलब्ध होणार असल्याचे परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी सुचित केले. प्राथमिक स्तरावर शारीरिक शिक्षण विषयाच्या कृती शिकविण्याऱ्या शिक्षिका, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वर्गाना शारीरिक शिक्षण विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षिका तसेच समुदाय प्रशिक्षक शिक्षिकांना सहभागी होणे अपेक्षित आहे. या नि:शुल्क प्रशिक्षणात ७०टक्के उपस्थिती असल्यास प्रमाणपत्र व ऑनलाईन परीक्षेत ६०टक्के गुण मिळाल्यास गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात या विषयातील तज्ज्ञ समजल्या जाणारे प्रा.रोझा लोपेझ (व्हेनेझुवेला), ए. क्लुका (अमेरिका), रोझा डिकेटम्युलर (व्हीएन्ना), डॉ. क्वॉडीया मॅगले (मेक्सिको), ग्लोव्हेना झेवियर (ब्राझिल), मारिया लुईसा (फिलिपाईन्स), आंतरराष्ट्रीय क्रीडा विज्ञान परिषदेचे डॉ. युरी शेफर, डॉ. एन सुझूकी (जपान), डॉ. जाहरोमी (ईरान), फ्लोना मुरे (आर्यलंड) तसेच भारतातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे सतीश जगताप म्हणाले की, हे एक उत्तम प्रशिक्षण आहे. मात्र त्या विषयी अधिकृत सूचना अद्याप मिळाली नाही. शिक्षण परिषदेचे संचालक टेमकर (पुणे) यांनी पुढील एक दोन दिवसात कळविले जाण्याची शक्यता व्यक्त केली. शालेय शिक्षण पातळीवर दिसून आलेल्या उदासीनतेवर भाष्य करण्याचे मात्र त्यांनी टाळले. विशेष म्हणजे,या पूर्वी केंद्र पुरस्कृत मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणाबाबतही अशीच उदासीनता दिसून आल्याचे ‘लोकसत्ता’ने निदर्शनास आणले होते.

केंद्र पुरस्कृत ‘फि ट इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत देशभरातील शिक्षिकांसाठी ८ मार्चला जागतिक महिला दिनी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन आठवडय़ांचे हे ऑनलाईन प्रशिक्षण हिंदी व इंग्रजी भाषेत असून एकूण २८ सत्रांत होणार आहे.