‘आर्थिकदृष्ट्या जर तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा’ असं वक्तव्य महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका महाविद्यालयीन कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘गरीब विद्यार्थ्यांना सरकार मोफत उच्च शिक्षण देणार का?’ असा प्रश्न एका पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्य़ाने विचारला असता ‘शिक्षण घेणं झेपत नसेल तर सोडून दे आणि नोकरी कर’ असं उत्तर विनोद तावडे यांनी दिलं.

विनोद तावडे यांनी ज्यावेळी ही प्रतिक्रिया दिली त्यावेळी एका विद्यार्थाने हे सर्व मोबाईल रेकॉर्डींग केले. तावडे यांच्या हे लक्षात आल्यानंतर मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करा आणि त्यांचे मोबाईल काढून घ्या’ असे आदेशही दिला. त्यांच्या आदेशानंतर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या मोबाईलमधले रेकॉर्डींग डिलीट केल्याचा दावा काही वेबसाईटने केला आहे.

दुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफीचे, मोफत पास, वसतिगृह प्रवेशाचे सरकारने पत्र काढून देखील विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही. सरकारचे आदेश असताना अंमलबजावणी का होत नाही, असे प्रश्न उपस्थित केल्याने महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे चांगलेच गांगरले. शैक्षणिक क्षेत्रात असंख्य ज्वलंत समस्या असून राज्यातील भाजप सरकारच्या गतिमानतेचे विद्यार्थ्यांनी चांगलेच वाभाडे काढले. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित विद्यार्थ्यांशी संवाद हा कार्यक्रम अडचणींच्या प्रश्नांचा भडीमार होत असल्याचे निदर्शनास येताच शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी (४ जानेवारी) आटोपता घेतला. खुद्द शिक्षणमंत्रीच समस्यांची दखल घेणार असल्याने शहरातील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी केली होती.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही शिक्षणमंत्र्यांच्या या अरेरावीचा ‘ट्विटर’वरून समाचार घेतला आहे. ‘राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्याला अटक करण्याचे पोलिसांना आदेश दिले. का? कारण तो विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारताना मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करत होता. त्यांना तरुण हे मतकेंद्रांची चौकीदारी करण्यासाठी हवे आहेत. तरुणांच्या शिक्षण आणि रोजगाराबाबत त्यांना उत्तरे द्यायची नाहीत.’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.