जागतिक महिला दिनानिमित्त बबिता ऊईके यांना तेजस्विनी सन्मान जाहीर

भारतीय स्त्री शक्ती शाखेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्य यंदाचा सुरुचि नंदकुमार पोफळी स्मृती व सोनाबाई जोगी स्मृती तेजस्विनी सन्मान शिक्षिका बबिता किशोर उईके यांना जाहीर झाला आहे. येत्या १३ मार्चला स्थानिक श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात ४.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे.मोकाट भटकणाऱ्या पाच वर्षांखालील अनेक गरीब मुले-मुलींच्या शिक्षणाच्या त्यांच्या अनोख्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अध्यक्षस्थानी वरोरा येथील शिक्षण विस्तार अधिकारी अर्चना मासिरकर राहणार असून त्यांच्याच हस्ते हा सन्मान बबिता यांना देणात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून येथील सुप्रसिद्ध रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्ते किशोर जामदार उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी बबिता यांना सोनाबाई जोगी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सोबतच भारतीय स्त्री शक्ती अंजली वैद्य स्मृती ‘अग्निशिखा’ या वार्षिक हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात येणार आहे. समस्यांवर चर्चा करण्यात वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा उपायांवर विचार करून कामाला लागा, मार्ग निश्चित सापडेल, अशा अर्थाची एक म्हण आहे. सध्या महाराष्ट्रात मराठी माध्यमांच्या शाळांची घटती पटसंख्या ही मोठी समस्या आहे. नोकरी गमावण्याच्या भीतीपोटी शिक्षक संघटनांमार्फत शासनावर दबाव आणण्याचे वेगवेगळे तंत्र अवलंबले जात आहे, परंतु समस्या कायमच आहे. येथील घुटकाळा वार्डातील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेचे शिक्षकही घटत्या पटसंख्येमुळे चिंतित होते, परंतु शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण पानघाटे यांच्या मदतीने बबिता उईके या शिक्षिकेने या समस्येवर स्वत:च एक अभिनव आणि लोकोपयोगी उपाय शोधला.

शाळेच्या सभोवती पाच वर्षांखालील अनेक गरीब मुले-मुली, आईवडील कामांवर गेल्यावर मोकाट भटकतांना दिसायची. या मुलांसाठी पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याचे बबिताने ठरवले. जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी शाळेतच हे वर्ग भरवण्यासाठी महापालिकेने परवानगी द्यावी, यासाठी मनपाला रीतसर अर्ज केला.

सुदैवाने परवानगीही मिळाली, परंतु पाठय़पुस्तके, दफतर, गणवेश, बूट आदींसाठी खर्चाची तरतूद होणे गरजेचे होते. यासाठी बबितायांनी नागरिकांशी संपर्क साधला आणि अनेक हात स्वेच्छेने अशा मदतीसाठी पुढे सरसावले. या मुलांच्या पालकांना जिद्द न सोडता शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात बबिता यशस्वी झाल्या. पहिल्याच वर्षी शाळेत ६० मुलामुलींनी प्रवेश घेतला. ही मुले दोन वर्षांनंतर आपसूकच प्राथमिक शाळेत दाखल होतील. मुलांना शिकवण्यासाठी दोन शिक्षिका नेमण्यात आल्या आहेत. यांचे मानधन बबिता आणि मुख्याध्यापक पानघाटे हेच पदरमोड करून देत आहेत. अशाप्रकारे शिक्षक देशाचे नागरिक घडवतात, हे म्हणणे बबिता यांनी खरे करून दाखवले आहे. अभिनय, नृत्य, क्रीडा, कार्यक्रमांचे संचालन यात निपूण असलेल्या बबिता यांनी या क्षेत्रातील अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. मनपा शिक्षक सहकारी पतसंस्था आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेत त्या पदाधिकारी आहेत. यांच्या या वाटचालीचा सन्मान म्हणून त्यांना तेजस्विनी सन्मान देण्यात येत आहे.