|| तुकाराम झाडे

हिंगोलीत तीन दिवसीय कार्यशाळांचा श्रीगणेशा:- जिल्ह्यतील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता यथातथाच असताना आणि त्यासाठी आता विशेष प्रयत्नांवर जोर देण्यासह सोबतीला माध्यान्ह आहार भोजनाचीही जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना आता आणखी नवे धडे गिरवावे लागणार आहेत. तंबाखूमुक्त शाळांसाठी आता शिक्षकांच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा श्रीगणेशा गुरुवारपासून झाला आहे. एकीकडे गुणवत्ता वाढीसाठीचे काम असताना आता नवनव्या कार्यशाळांना सामोरे जावे लागत आहे.

जिल्ह्य़ात जिल्हा परिषदेच्या सुमारे ८७० शाळा असून बहुतांश ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता यथातथाच आहे. अध्ययनस्तर निश्चितीमध्ये जिल्ह्यतील शाळांची भाषा, गणित, इंग्रजी विषयाची शैक्षणिक गुणवत्ता केवळ ५० टक्के एवढीच आली आहे.या प्रकारामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वसाधारण सभेमध्ये खडे बोल सुनावले होते.

परिणामी अधिकाऱ्यांनी आता तालुकास्तरावर माध्यान्ह भोजनाचे काम सांभाळत गुणवत्ता कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. या कार्यशाळेमध्ये कधी खडय़ा स्वरात तर कधी कारवाईचा इशारा देऊन गुणवत्ता वाढीचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे आता शिक्षकांकडून गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे चित्र असताना शिक्षण विभागाकडून नवनव्या कार्यशाळांचा घाट घातला जात आहे.

जिल्ह्यत तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी शिक्षण विभागाने मुंबईच्या एका संस्थेमार्फत कार्यशाळांचे आयोजन केले आहे. यामध्ये गुरुवारी जिल्हास्तरावर सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात कार्यशाळा घेतली. त्यानंतर उद्या शुक्रवारी औंढा नागनाथ, कळमनुरी व िहगोली गटसाधन केंद्रात कार्यशाळा घेण्याचे नियोजन केले आहे, तर शनिवारी वसमत व सेनगाव गटसाधन केंद्रात कार्यशाळा होणार आहे. तंबाखू व्यसन सुटावे हे खरेच. मात्र, तो शिक्षकांचा प्राधान्यक्रम असावा का आणि त्यासाठी किती वेळ द्यावा, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.  गुणवत्तेसाठी काम करण्याचे सोडून देऊन व्यसनमुक्तीचे मूल्य रुजविण्यासाठी शिक्षकांना अतिरिक्त काम दिले जात असल्याची भावना काहीजणांनी व्यक्त केली.