आधुनिक संपर्क साधनांमुळे जग जवळ आल्याने मुलांची जिज्ञासा आणि कल्पनाशक्ती अफाट वाढली आहे. प्रचलित शिक्षण पद्धतीत बदल करून मुलांमधील कल्पनाशक्तीला चालना देणारे शिक्षण हवे, असे मत राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
रविवारी धरणगाव तालुक्यातील चावलखेडे येथे नीळकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेने ५० वर्षांचा टप्पा पूर्ण करणे ही मोलाची गोष्ट आहे, असे खडसे यांनी नमूद केले. त्या काळात जर ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू झाल्या नसत्या, तर अनेक पिढय़ांना शिक्षणाची दारे बंद झाली असती. त्यामुळे त्या पिढीतील लोकांची आठवण होते. हल्लीच्या शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. मुलांना केवळ कारकुनी शिक्षण देऊन उपयोगाचे नाही. त्यास व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली गेली पाहिजे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षणासोबत रोजगारक्षम तरुण पिढी तयार होईल. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यासाठी नसावे, तर ते संस्कारक्षम व रोजगारक्षम पिढी निर्माण करणारे असावे, अशी अपेक्षाही खडसे यांनी व्यक्त केली.
सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयागताई कोळी, खा. ए. टी. पाटील, आ. स्मिताताई वाघ, आ. गुरूमुख जगवाणी उपस्थित होते.