शिक्षणाच्या बाबत विद्यार्थ्यांच्या सर्व शंका एक वेळ दूर केल्या जातील. मात्र, लघुशंकेचे निराकरण करण्याची यंत्रणा पुरेशी नसल्यामुळे ‘लघुशंकेविना शिक्षण’ घेण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर येत आहे. परिणामी विविध गंभीर आजारांना, प्रामुख्याने मुलींना सामोरे जावे लागत असल्याची भीती नामवंत मूत्ररोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शहरात बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंत सुविधा आहेत. यात विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. राज्यभर गाजलेल्या नामवंत शाळा, महाविद्यालयांतही मुलींच्या स्वच्छतागृहाची पुरेशी सोय नाही. स्वच्छतागृह नावाला असले, तरी तेथे स्वच्छता ठेवली जात नाही. पाण्याची अडचण लातूरकरांना कायमचीच. पण तेच कारण सांगत स्वच्छता पाळली जात नाही. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते, या नावाखाली कोटय़वधी रुपये लाटून व टोलेजंग इमारती उभारूनही मुलींसाठी पुरेसे स्वच्छतागृह उपलब्ध केले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.
भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय सरचिटणीस कुमुदिनी भार्गव यांनी संघटनेतर्फे या बाबत सर्वेक्षण हाती घेतले. शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींची व शहरभर महिलांची स्वच्छतागृहाअभावी जी कुचंबणा होते आहे, त्याचा अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व शिक्षण विभागाकडे हा अहवाल सादर केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिकेकडे शहरातील शाळा-महाविद्यालये व शिकवणीवर्गात उपलब्ध असणाऱ्या स्वच्छतागृहांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. शहरातील अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या महापालिकेला या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच नाही.
मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी या संदर्भात सांगितले की, स्वच्छतागृहाअभावी तासन्तास लघवीला न गेल्यामुळे मुतखडय़ाचे प्रमाण वाढते. मात्र, स्वच्छतागृहाची सोय नसल्याने मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. लघवीची सुविधा नसल्यामुळे मुली पाणी कमीच पितात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहे. तसेच आहेत त्या स्वच्छतागृहांतही स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे संसर्गरोगाचे प्रमाणही प्रचंड वाढत आहे.
डॉ. हंसराज बाहेती यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे मुली-महिला घरातून बाहेर पडण्यापूर्वीच स्वच्छतागृहाचा वापर करतात व परत घरी आल्यानंतर स्वच्छतागृहात जातात. नोकरीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी अथवा शाळा-महाविद्यालयात त्यांना कुचंबनेला तोंड द्यावे लागते. महिलांच्या लघवी साठवण्याच्या पिशवीची क्षमता ३०० ते ५०० मिलीइतकी असते. मात्र, मूत्रविसर्जनाची सुयोग्य व्यवस्था नसल्यामुळे त्या तासन्तास वाट पाहतात. परंतु त्यामुळे त्यांच्या पिशवीची क्षमता ढिली होऊन वाढत जाते. कालांतराने ही क्षमता १ हजार मिली इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी महिलांना आयुष्यभर अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
शिकवणीवर्गातही उदासीनता
लातूरमध्ये शाळेव्यतिरिक्त शिकवणीवर्गात जाण्याची सवय पहिलीपासूनच आहे. आठवीनंतर साधारण ९० टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनी खासगी शिकवणीवर्गाला जातात. आठवी ते बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या शहरात किमान ५० हजारांच्या आसपास आहे. पकी मुलींची संख्या २५ हजारांच्या घरात आहे. शिकवणीवर्गात मुलींसाठी स्वच्छतागृहे अतिशय अपुरी आहेत. जेमतेम ३ टक्के शिकवणीवर्गात स्वच्छतागृहांची सोय आहे. उर्वरित ठिकाणी ही सोय नाही. त्यामुळे मुलींची प्रचंड कुचंबणा होते.