विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात पुस्तके समाविष्ट करताना हितसंबंध व राजकारण प्रभावी ठरते. त्यामुळे फारशी महत्त्वाची नसलेली पुस्तकेही अभ्यासक्रमात समाविष्ट केली जातात, अशी टीका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केली.

येथील बोरावके महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मराठी विषयाच्या चर्चासत्रात डॉ. कोत्तापल्ले बोलत होते.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले,ह्व साहित्यक्षेत्राला प्रभावित करणाऱ्या घटकांमध्ये विद्यापीठांचा वाटा आहे. अभ्यासक्रम, भाषेचा मुद्दा व पुस्तके समाविष्ट करताना तणाव, हितसंबंध, राजकारण असू शकते. अशा वेळी श्रेष्ठ साहित्याला मान्यता मिळून ते अभ्यासक्रमाचे भाग होईल, याची शक्यता बऱ्याचदा नसते. फारशी महत्त्वाची नसलेली पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट केली जातात आणि शिकवणारे ती चांगली आहेत असे मानून शिकवतात. त्यातील दोष दाखवत नाहीत. संशोधन करताना तेच होते. साहित्य व्यवहाराकडे साहित्य संस्था तटस्थपणे न पाहता हितसंबंधातून पाहतात. प्रसिद्धिमाध्यमेही काय दाखवायचे किंवा कशाला प्रसिद्धी द्यायची हे आधीच ठरवतात. जनसामान्यांवर प्रभाव टाकणारी माध्यमे हे गुणवत्ता असली तरी त्याची दखल घेत नाहीत, पुरस्काराचेही तसेच आहे.

‘राजकीय संस्कृती आता गुन्हेगारांच्या जवळ चालली आहे. लोकसभेत निवडून आलेल्या वीस टक्के लोकांवर गुन्हे दाखल असतात. त्यामुळे त्यांचा साहित्यसंस्कृतीला पािठबा कसा घेणार. साहित्याचा अभ्यास हा एकारलेपणाने न करता तो बहुविध पद्धतीने झाला पाहिजे,’ अशी अपेक्षा डॉ. कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.