लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे देशात करोना संकटाशी प्रभावी सामना करता आला. वेळीच टाळेबंदी लागू करण्यात आल्याने करोनाचा अधिक प्रसार रोखणे शक्य झाले, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी येथे केला.
मोदी सरकार-२ ची वर्षपूर्ती झाल्याने वर्षभरातील केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजपच्यावतीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ हरिश पिंपळे, महापौर अर्चना मसने, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली. भारताने करोनाच्या जागतिक साथीचा सक्षमपणे मुकाबला केला. भारताची लोकसंख्या आणि करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या १४ देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. मात्र, एकसारखीच लोकसंख्या असूनही १ जूनला १४ देशांमधील एकत्रित लोकसंख्येपैकी करोना संसर्ग झालेल्यांची संख्या भारताच्या २२.५ पट अधिक आहे. या देशांमध्ये मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट आहे. टाळेबंदी, वैद्याकीय सुविधा, आणि रुग्णांवर अचूक उपचारामुळे हे शक्य झाले. देशभरातील जनतेने टाळेबंदीचे पालन केल्याने करोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवता आला, असेही ते म्हणाले.
करोनामुळे अर्थव्यवस्था प्रभावित झाली असतांना केंद्र सरकारने तातडीने एक लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण मदत केली. देशातील नागरिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची मदत मोदी सरकारने जाहीर केली. त्यात अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघू उद्योजक, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतिमान करण्यात आले. वर्षभरात जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी, अयोध्या येथे राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरू करणे तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याने त्यांनी सांगितले. वर्षभरात अकोला लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांची माहितीही त्यांनी दिली.
अकोल्यात समन्वयाचा अभाव
अकोला जिल्ह्यात प्रशासनातील समन्वयाच्या अभावाने करोनाचा प्रादुर्भाव वाढला. शहरात विलगीकरण योग्य झाले नसल्याने रुग्ण संख्या वाढत आहे, असे संजय धोत्रे म्हणाले. आगामी काळात संपूर्ण आढावा घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 8:15 pm