शेतकऱ्यांनी पाटाने नव्हेतर ठिबक सिंचनाने शेतीला पाणी दिल्यास एक एकराच्या पाण्यामध्ये तीन एकर क्षेत्र ओलिताखाली येताना उत्पादनही वाढेल, असा सल्ला ज्येष्ठनेते खासदार शरद पवार यांनी दिला. शेतीला लागणाऱ्या पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचन योग्य पर्याय असून, ते धोरण शासनस्तरावर राबवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

पडळ (ता. खटाव) येथे खटाव-माण अ‍ॅग्रोच्या साखरपोत्यांचे पूजन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, खटाव-माण अ‍ॅग्रोचे अध्यक्ष माजी आमदार प्रभाकर घार्गे, उपाध्यक्ष मनोज घोरपडे उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, की साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच इथेनॉल आणि वीजनिर्मिती केल्यास साखर कारखानदारी टिकायला मदत होईल. माण-खटाव तालुक्यांचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटवण्यासाठी स्थानिक नेत्यांसोबत नजीकच्या काळात जलसंपदामंत्र्यांशी बैठक घेणार असून, इथल्या पाण्याची टंचाई सोडवणार आहे. रामराजे निंबाळकर म्हणाले, की सातारा जिल्ह्यतील धरणांमधील कितीही मोठा पाणीसाठा असला तरी त्याला मर्यादा आहेत. शेतीला बेसुमार पाणी देण्यामुळे धरणांचा पाणीसाठा आपल्याला पुरणार नाही. याची प्रत्येक शेतकऱ्याने दखल घेऊन उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरायला शिकायला हवे. यासाठी आपली ऊसशेती जास्तीत जास्त ठिबकखाली आणून जमिनीचा पोत कायम राखावा. ऊस शाश्वत उत्पादन देणारे पीक असलेतरी त्याला आता पर्याय शोधायला हवा असे आवाहन निंबाळकर यांनी या वेळी यांनी केले. प्रास्ताविक मनोज घोरपडे यांनी केले. कार्यक्रमास कराड अर्बन अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचीही उपस्थिती होती.