हर्षद कशाळकर

टाळेबंदीमुळे बंद पडलेले मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी पनवेल ते कोलाडदरम्यानचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न असणार आहे. वास्तविक २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या या महामार्गाचे काम पूर्ण होणार तरी कधी, हा कोकणवासीयांना पडलेला प्रश्न अद्यापही कायम आहे.

२०११ मध्ये महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरवात झाली होती. मात्र नंतर हे काम रखडले. सुरुवातीला भूसंपादनातील अडचणीमुळे कामास विलंब झाला. नंतर पर्यावरण विषयक परवानग्या न मिळाल्याने काम रखडले. नंतर मूळ ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे काम रखडले. यानंतर नवीन ठेकेदारांच्या माध्यमातून रखडलेले काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला गेला. सुरुवातीला २०१४ पर्यंत पूर्ण होणार होते, मात्र ते अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही.

या कामाला गती देण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू  होता. पेण, तारा आणि उचेडे येथील उड्डाण पुलांची कामे सोडली तर पळस्पे ते वडखळ महामार्गाचे काम मार्गी लागले होते. हे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण देशभरात करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर टाळेबंदी लागू झाल्याने हे काम बंद पडले होते. जिल्हाधिकारी आणि महामार्ग प्राधिकरणाच्या प्रयत्नांनंतर हे काम आता पुन्हा एकदा सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी कोलाडपर्यंतचा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामार्ग प्राधिकरणाने ठेवले आहे.

शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा

रुंदीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात इंदापूर ते कशेडी मार्गाचे काम केले जाणार आहे. हे कामही डिसेंबर १८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र दुसऱ्या टप्प्यातील कामही दिलेल्या मुदतीते पूर्ण होऊ शकले नाही. दुसऱ्या टप्प्यात रायगड जिल्ह्य़ातील ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. या कामामुळे एकूण ४७ गावे बाधित झाली आहेत. रुंदीकरणाच्या कामासाठी एकूण २२९.३७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया झाली असली तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही अशा तक्रारी आहेत. रस्त्याची कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. मात्र पुलांची कामे अद्याप शिल्लक आहेत. कशेडी घाटाला पर्यायी बोगद्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. पण हे काम पूर्ण व्हायला किमान एक ते दीड वर्षांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे.

महामार्गाचा पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीचे रुंदीकरण होणार आहे. यामुळे एकूण ७८ गावे बाधित होणार आहेत. यासाठी एकूण २०९.२८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. आता महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम बऱ्याच प्रमाणात मार्गी लागले आहे. मात्र भुयारी मार्ग, उड्डाण पुलांची कामे अद्याप बाकी आहेत.

महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी पळस्पे ते कोलाडपर्यंतच्या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. वाहनांची वर्दळ नगण्य असल्याने हे काम वेगाने होऊ शकेल.

– प्रशांत फेगडे, कार्यकारी अभियंता, महामार्ग प्राधिकरण