सांगली : सांगली-मिरज शहरासह जिल्ह्य़ात रमजान ईद व बसवेश्वर जयंती करोना संकटामुळे अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरातच अदा करून करोनापासून लवकर मुक्ती मिळावी, अशी प्रार्थना केली. ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटीऐवजी समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला.

रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज अदा करण्यावर करोना संकटामुळे र्निबध घालण्यात आले आहेत. यामुळे अनेक मुस्लिम बांधवांनी आप-आपल्या घरातच ईदची नमाज अदा केली. सार्वजनिक ठिकाणी ईदची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव येण्याची शक्यता गृहीत धरून सांगलीतील ईदगाह मदानाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर मिरजेत ठिकठिकाणी पोलीस, गृहरक्षक दल आणि राखीव पोलीस दलाचे जवान तनात करण्यात आले होते.

बसवेश्वर जयंतीही साधेपणाने साजरी

लिंगायत समाजाच्या वतीने शुक्रवारी बसवेश्वर जयंतीही साधेपणाने साजरी करण्यात आली. मिरजेत लिंगायत समाजातील काही कार्यकर्त्यांनी घरातच बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले. तर मिरज पंढरपूर रोडवर असलेल्या बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे मर्यादित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. या वेळी बसेवश्वर महाराजांच्या पुतळ्याचे पूजन शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू ताशीलदार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्थायी सभापती पांडुरंग कोरे, माजी नगराध्यक्ष डॉ. महादेव कुरणे, बाबासाहेब आळतेकर आदी उपस्थित होते.