डहाणू : टाळेबंदीत गुजरातमध्ये अडकलेल्या डहाणू तलासरीतील खलाशांना घेऊन आलेल्या आठ बोटी अटी-शर्तींवर पुन्हा गुजरातकडे रवाना झाल्या आहेत. १४ एप्रिल रोजी बोटवाहतूक बंदीचा आदेश असताना डहाणू जेटी येथे राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. १४ एप्रिल रोजी मांगलोर गुजार येथील बोटींनी डहाणू तलासरीतील तब्बल ३०७ खलाशांना पोचवले होते.

डहाणू, तलासरी तालुक्यातील हजारो मजूर खलाशी म्हणून बोटींवर काम करतात. गुजरात, तसेच इतर राज्यांत खलाशांना मोठी मागणी असते. मात्र, करोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी राष्ट्रीय आपत्ती कायद्यांतर्गत बोट वाहतुकीवर बंदी आणली गेली. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेले हजारो खलाशी समुद्रात अडकले.

या बोटींना महाराष्ट्राच्या हद्दीत येण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे खलाशांचे प्रचंड हाल सुरू झाले. त्यातील काही खलाशांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून महाराष्ट्रात येण्यास परवानगी द्यावी, यासाठी अनेकांना विनंत्या केल्या. त्यानंतर काही स्थानिकांनी लोकप्रतिनिधींच्या मदतीने खलाशी बोटींना टप्प्याटप्याने डहाणू जेटी येथे उतरण्याची व्यवस्था केली.

तपासणी करून अलगीकरणाचा शिक्का

* राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे उल्लंघन केल्याने डहाणू पोलिसांत बोट मालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. खलाशांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का मारण्यात आला.

* दुसऱ्या दिवशी त्यांना घरी रवाना करण्यात आले. दरम्यान  कायदेशीर पूर्तता करण्यात आली. मात्र, खलाशांना सोडण्यासाठी आलेल्या बोटी मात्र डहाणू जेटी येथे थांबवण्यात आल्या होत्या.

* न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर त्यांना पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान गुरुवारी त्यापैकी आठ बोटी गुजरातला रवाना करण्यात आल्या आहेत.