रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत आठजणांचा करोनामुळे मृत्यू ओढवल्यामुळे वाढता मृत्यूदर हा काहीसा चिंतेचा विषय बनला आहे.

दोन दिवसांतील आठ रुग्ण मृतांपैकी शनिवारी दोन, तर रविवारी एकाच दिवसात सहाजणांची भर पडली आहे. मृतांमध्ये चिपळूण, खेड आणि संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी २, तर गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच त्यापैकी एक ३२ वर्षांचा तरुणही आहे.

जिल्ह्यात करोनामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या २१७ रूग्णांपैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ६३, तर चिपळूण तालुक्यात ५१ रुग्ण मृत पावले आहेत. त्या खालोखाल खेड ३७, दापोली २५ आणि संगमेश्वर तालुक्यात १९ रूग्ण आहेत. ही चिंताजनक बाब असून मृत्यूदर पुन्हा ३.२३ टक्के झाला आहे.

दरम्यान, दिवसभरात तब्बल २३५ रुग्णांनी करोनावर मात करत एकाच दिवसात करोनामुक्तांचा नवीन उच्चांक गाठला आहे. त्यामुळे बरे होण्याचा दरही ७०.८९ टक्के झाला आहे.

जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाणही सलग तिसऱ्या दिवशी कमी राहिले असून शनिवारी दिवसभरात ९४ नवीन रुग्ण सापडले आहेत. शहरांसह गावांमधील लोकांच्या तपासण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्या तुलनेत या रुग्णांचा उद्रेक झालेला नाही. नवीन रुग्णांबाबत रत्नागिरी आणि चिपळूण हे दोन तालुके सातत्याने आघाडीवर आहेत. या ९४ रूग्णांपैकी रत्नागिरी (३३), आणि चिपळूण (१८) तालुके नेहमीप्रमाणे आघाडीवर आहेत.  त्या खालोखाल गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी १३ रूग्ण आहेत.