केंद्र सरकारने दिल्ली-मुंबई या महत्त्वाकांक्षी उद्योगमार्गातून (इंडस्ट्रियल कॉरिडॉर) रायगड जिल्हय़ातील दिघी बंदर वगळल्याने आता दिघी ते शेंद्रा (जालना) या दोन्ही औद्योगिक वसाहतींना जोडणारा रायगड-पुणे-नगर-औरंगाबाद अशा चार जिल्हय़ांतून जाणारा आठपदरी जलदगती मार्गही आता बारगळल्यात जमा आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: पुढाकार घेऊनही या प्रकल्पातून दिघी बंदर व पर्यायाने हा रस्ताच बारगळावा याबाबत आश्चर्य व्यक्त होते.
दिल्ली-मुंबई या महत्त्वाकांक्षी उद्योगमार्गात राज्यातील दिघी (रायगड) व औरंगाबादजवळील शेंद्रा या दोन सर्वात मोठय़ा व महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती ठरणार होत्या. त्या परस्परांना जोडण्यासाठीच दिघी-महाड-मुळशी-पुणे-नगर-औरंगाबाद-जालना आशा सुमारे ४०० किलोमीटरच्या अंतरासाठी जलदगती आठपदरी रस्ता तयार करण्यात येणार होता. या उद्योगमार्गाच्या मूळ प्रकल्पातच या रस्त्याचाही समावेश करण्यात आल्याने रायगड, पुणे, नगर व औरंगाबाद अशा चार जिल्हय़ांना त्याचा मोठा लाभ होणार होता.
या चार जिल्हय़ांतील सध्याच्या रस्त्यांचेच आठपदरी रुंदीकरण करून त्याचे या जलदगती मर्गात रुंदीकरण करण्यात येणार होते. मात्र आता मूळ प्रकल्पातील दिघी वसाहतच रद्द झाल्याने हा महत्वाकांक्षी रस्ताही बारगळणार आहे.
कोकण किनारपट्टी ते मराठवाडा असे वाहतुकीचे थेट जाळे निर्माण करणारा हा जलदगती मार्ग ज्या बागातून जोतो, त्या भागातही मोठय़ा विकासाच्या संधी उपलब्ध होणार होत्या. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत:च या आठपदरी जलदगती मार्गासाठी विशेष पुढाकार घेतला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या चारही जिल्हय़ांतील अधिकाऱ्यांशी केवळ या रस्त्यासाठीच त्यांनी चार वेळा बैठका घेतल्या होत्या. या प्रत्येक बैठकीत बारीकसारीक गोष्टींसह चर्चा होऊन अखेर या रस्त्याला हिरवा कंदील देण्यात आला होता. तशी घोषणाही राज्य सरकारने केली होती. रस्त्याचा अंतिम आराखडाही तयार करण्यात आला होता.
त्यानुसार ज्या ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी होत्या त्या ठिकाणी सरसकट उड्डाणपूल बांधून आठपदरी रस्ता करण्यात येणार होता. यातील एक उड्डाणपूल पुणे ते शिक्रापूर या तब्बल ३५ किलोमीटर अंतरासाठी राज्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल उभारण्यात येणार होता.
विशेष म्हणजे त्यासाठीच या चारही जिल्हय़ांतून जाणाऱ्या या रस्त्यांना राज्यमार्गाऐवजी प्रमुख राज्यमार्गाचा दर्जाही देण्यात आला होता. हेच मार्ग पुढे राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित होतात. मात्र या साऱ्या गोष्टी आता बारगळल्या आहेत.