जिल्ह्य़ात करोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने होणारी वाढ जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी ठरत असून बुधवारी नव्याने प्राप्त तपासणी अहवालांमध्ये भडगाव येथील आठ जणांचा अहवाल सकारात्मक आला. जिल्ह्य़ातील बाधितांच्या संख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला असून सायंकाळी पाचपयंत ती ५०८ पर्यंत गेली आहे.

बुधवारी सकाळी जळगाव, रावेर, भडगाव, धरणगाव येथील नमुना घेण्यात आलेल्या ६४ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ५७ अहवाल नकारात्मक, तर सात जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकारात्मक अहवाल आलेले सातही जण भडगाव येथील आहेत. दुपारनंतर प्राप्त ११९ अहवालांमध्ये ११७ अहवाल नकारात्मक, तर दोन सकारात्मक आले. सकारात्मक आढळलेल्या व्यक्ती वडजी (ता.भडगाव) आणि धरणगाव येथील आहेत. एरंडोल येथील संशयित सर्व ७२ व्यक्तींचे अहवाल नकारात्मक आल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला.

दुपारनंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात भडगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, यावला, सावदा, भुसावळ येथील संशयितांचे ३७ अहवाल प्राप्त झाले. त्याचील ३० नकारात्कम, तर सात सकारात्मक आढळले. सकारात्मक अहवालांमध्ये अमळनेर तीन, भुसावळ दोन, एरंडोल आणि सावदा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.