शहरात करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रभाग क्रमांक आठ, नऊ आणि १० बुधवारपासून दोन दिवसांसाठी संपूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या भागातील लोकांची ‘थर्मल स्कॅनिंग’ करण्यात येत आहे. अतिशय दाटीवाटीच्या नागरी वस्त्यांमधून महापालिकेच्या २० पथकांद्वारे नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत सुमारे आठ हजार लोकांची थर्मलनुसार तपासणी करण्यात आली आहे. जनजागृतीसह परिसरात स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत आहे.

साक्री शहरात करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर धुळे शहरातही अशी परिस्थती उद्भवल्यास काय उपाय योजना कराव्या लागतील, यासाठी रंगीत तालीम म्हणून जिल्हा प्रशासनासह महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील विशिष्ट भाग संपूर्ण प्रतिबंधित करण्याचा प्रयोग केला आहे. शहरातील तीन प्रभागांमध्ये बुधवारपासून जीवनावश्यक वस्तूंचीही दुकाने बंद ठेवण्यात आलीे.जुन ेधुळे, आझाद नगर, मच्छिबाजार, मौलवीगंज, अकबर चौक, माधवपुरा, तिरंगा चौक, अमरनगर, आंबेडकर नगर, पारोळारोड या संमिश्र वस्तीमधील लोकांची तपासणी करण्यास सुरूवात झाली. थर्मल स्कॅनिंग करताना लोकांमध्ये करोनाची भीती होती. ती भीती दूर करण्यासाठी स्वत: महापौर चंद्रकांत सोनार आणि आझाद नगरचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आपली थर्मल स्कॅनिंग करुन घेतली. थर्मल स्कॅनिंगद्वारे व्यक्तीचा ताप तपासला जातो.

सहाय्यक आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील यांच्यासह १० पथके, तर सहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांच्यासह १० पथके लोकांची तपासणी करीत आहेत. लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वात मुस्लिमबहुल भागातून सुमारे पाच हजार लोकांची, तर चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वात जुने धुळे, मनमाड जीन, सुभाष नगर, भाई गल्ली, चिंचगल्ली या भागात सुमारे तीन हजार लोकांची तपासणी झाली. या तपासणी मोहिमेत जमिअते उलेमा संघटनेच्या १० ते १५ डॉक्टरांचीही मदत होत आहे. तपासणी करताना या भागांमध्ये स्वच्छता आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पत्रके वाटून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

यातून करोना संशयितांचा शोध घेतला जात असून नागरिकांमधील भीतीही दूर होण्यास मदत होत आहे. महापालिकेच्या वतीने थर्मल स्कॅनिंग सुरु असताना संशयितामध्ये लक्षणं आढळल्यास त्यांना तातडीने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे.

साक्रीतील पोळा चौक प्रतिबंधित

साक्रीत करोनाबाधिताच्या मृत्यूनंतर पोळा चौक परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. शहरात १४ दिवसांसाठी टाळेबंदी कठोर करण्यात आली आहे. संचारबंदीचा आज पूर्णपणे फज्जा उडाल्याचे साक्रीतील मेन रोड परिसरात दिसून आले. अ‍ॅक्सिस बँक शाखा आणि परिसरात शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. लोकांनी घरात थांबावे, प्रशासनाला सहकार्य करावे, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी बंदोबस्तात वाढ करून लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पावले उचलली. परंतु, त्यानंतरही बुधवारी सकाळी साक्रीच्या मेन रोड परिसरात शेकडोच्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती.